जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे राज्य सरकार वीज स्वस्त असल्याचे दावे करत असतानाच, दुसरीकडे औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीज विक्रीवरील करात (Electricity Sale Tax) प्रतियुनिट ९.९० पैशांची मोठी वाढ करण्यात आली असून, याची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून सुरू झाली आहे.

महावितरणने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही अतिरिक्त वसुली राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांकडून केली जाणार आहे. या निर्णयामुळे आधीच उत्पादन खर्चात वाढ सोसणाऱ्या उद्योजकांसमोर आता आर्थिक पेच निर्माण झाला आहे.दरम्यान, व्यावसायिक वापरासाठी वीज महाग झाल्यामुळे सेवा आणि वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही काळापूर्वीच सरकारने वीज दरात सवलत किंवा दर स्थिर ठेवण्याचे संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात विक्री करात वाढ करून सरकारने ‘मागच्या दाराने’ वीज महाग केल्याची टीका आता होत आहे.
नवीन दर काय?
महावितरच्या नव्या दरानुसार, औद्योगिक ग्राहकांकडून विक्री कर म्हणून प्रतियुनिट २८.९४ पैसे, तर व्यावसायिक ग्राहकांकडून २७.९० पैसे आकारले जाणार आहेत. यापूर्वी हा दर अनुक्रमे १९.०४ पैसे आणि १८.०० पैसे इतका होता.











