जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२५ । जळगावसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा कोलमडला आहे. राज्यावरील अवकाळीचं सावट अद्यापही कायम असून हवामान खात्यानं पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

‘बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालींमुळे राज्यात पुन्हा पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे सोमवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत. याच परिणाम राज्यावर देखील होणार आहे.

राज्यात ३० ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याच दरम्यान मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र, गोवा आणि कोकण किनारपट्टीसह विविध ठिकाणी मुसळधारेचा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेग अधिक राहाणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला तटरक्षक दलाने दिला आहे. मराठवाड्यात २९ ऑक्टोबरपर्यंत काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल. लक्षद्वीप, कर्नाटक आणि केरळ किनाऱ्यावरही २७ ऑक्टोबरपर्यंत वादळावाऱ्यांसह पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. यामुळे सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मकासह इतर पिकांचे मोठं नुकसान झालं. पावसाचा मुक्काम वाढला असून जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.










