Weather News : मार्च नाही, फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा बसणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । जळगावसह राज्यात मागील काही दिवसापासून तापमानात चढ उतार दिसून आले. यामुळे रात्री गारवा तर दिवसा उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रात्री जाणवणारा गारवाही कमी झालेला पाहायला मिळत आहे. जळगावात किमान तापमानाचा पारा १५ अंशावर तर कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. दरम्यान आता फेब्रुवारी महिन्यात देशासह महाराष्ट्रात थंडी कमी राहण्याची शक्यता असून याच महिन्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह देशभरात फेब्रुवारी महिन्यापासून किमान आणि कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मुंबई, किनारपट्टी व उत्तर व मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार असला तरी उत्तर महाराष्ट्रात चार ते पाच दिवस तीव्र थंडी राहण्याची स्थिती आहे. तापमान सुमारे ३ ते ५ अंश सेल्सियस पर्यंत जास्त असू शकते. त्यामुळे राज्यात या महिन्यात थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात ला – निना सक्रीय आहे पण, कमजोर स्थितीत आहे. एप्रिलअखेरपर्यंत तो सक्रीय राहून, त्यानंतर तो तटस्थ अवस्थेत जाईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
देशभरात नोव्हेंबर महिन्यापासून साधारणपणे थंडीला सुरुवात होते. थंडीचा हा हंगाम फेब्रुवारीपर्यंत असतो. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होऊन उन्हाचा कडाका जाणवू लागतो. हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान उत्तर, मध्य महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये काही दिवस थंडी कायम राहणार आहे.
जळगावमधील तापमान?
जळगावात कमाल तापमानात सातत्याने वाढ सुरू आहे. पारा ३३ अंशांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे दिवसभर उष्मा जाणवत आहे. उन्हाच्या झळा अचानकपणे तीव्र झाल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. दिवसा थंडी गायब झाली असली तरी रात्री मात्र थंडी असते.