⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा ; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२३ । राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत आहे तर दुसरीकडे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. आजही राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.राज्यातील या बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्यांसोबत शेतकऱ्यांना देखील बसत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच, राज्यातील अनेक जिल्ह्यांना 13 ते 14 एप्रिल रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, नागपूर या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

गारपिटीचा इशारा
तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा दिला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी. तसंच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.