जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । राज्यातील अनेक ठिकाणी सध्या कोसळधार पाऊस सुरु आहे. विविध जिल्ह्यात मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. यामुळे रस्त्यांना नद्या-नाल्यांचे स्वरूप आले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान खात्यानं २१ ऑगस्टपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यात आज पावसाचा येलो देण्यात आला आहे

तर मुंबईत मुसळधार पावसाने कहर केला असून याच दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेने यासोबतच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अत्यावश्यक कारणास्तव काम सुरु ठेवायचे असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात आज कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
हवामान विभागाने 19 ऑगस्टसाठी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केलाय. नाशिक, पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरासाठी देखील रेड अलर्ट देण्यात आलाय. यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व पाचही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केलाय. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि बीड या सातही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.
.. म्हणून पावसाचा जोर वाढला?
महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात पाऊस पडण्याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन डिप्रेशन झाल्यामुळे पावसाचा जोर वाढलाय. त्याचबरोबर मान्सूनही सक्रिय झालाय. पूर्व-पश्चिम अशी द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोकण ते उत्तर केरळपर्यंतच्या किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस होतोय.
जळगावात ९४८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका!
गेल्या आठवड्यापासून दाखल झालेल्या पावसाचा दि.१५ ते १७ दरम्यान तब्बल ९ हजार ४८२ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या तालुक्यात १९५ घरांची पडझड झाली असताना १०४ जनावरांचा बळी गेला आहे. दि.१५ पासून पावसाने हजेरी लावली. रात्रीतून धो-धो बरसणाऱ्या या पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. तर एरंडोल आणि धरणगावमध्ये सर्वाधिक दुधाळ जनावरांचा बळी गेला असताना पारोळ्यात ६० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज मंगळवारी जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे.












