जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२५ । राज्यात नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. मात्र काही ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्याने आता या संपूर्ण निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. यानंतर आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियोजन केले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला राज्यात 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर आलेली आहे.

१५ ते १७ डिसेंबर या कालावधीत राज्यातील महापालिका निवडणुकीची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ३२ पैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही, त्यामुळे या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील फक्त दोन महापालिकात आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. या निवडणुका डिसेंबरमध्येच होऊ शकतात.
नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकेत राजकीय आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. १७ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सुनावले. निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली, तिथे निवडणुका घेता येणार नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यामुळे १७ जिल्हा परिषदा मागे ठेवून फक्त १५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेता येत नाहीत. त्यामुळे आता आयोगाकडून आधी महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकांच्या निवडणुकासाठी आयोगाला १० डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. १० डिसेंबर रोजी महापालिकांची वार्डनिहाय मतदार यादी फायनल होईल. त्याचा आढावा आयोगाकडून घेतला जाईल. त्यानंतर तीन ते चार दिवसानंतर राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. तर झेडपी, पंचायत समित्याच्या निवडणुका ५ ते ३१ जानेवारी या वेळात होऊ शकतात.












