जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२५ । राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. उद्या ३ डिसेंबर रोजी या निवडणुकीचा जाहीर होणार होता. मात्र आता निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. हायकोर्टाकडून उद्याची मतमोजणी रद्द करण्यात आली असून निकालाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

या निवडणुकीचा संपूर्ण निकाल २१ डिसेंबर रोजीच जाहीर केला जाईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पुढील सुनावणी १० डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. Exit poll देऊ नयेत, असेही कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.












