जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२५ । कफ सिरपच्या सेवनामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर आता महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने कोल्ड्रिफ सिरपचा वापर थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे.

कफ सिरपच्या सेवनामुळे आतापर्यंत मध्य प्रदेशात 14 मुलांचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानमध्ये 3 मुलांच्या मृत्यू झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे. या मुलांना दिलेल्या ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपमुळे दुष्परिणाम झाले असावेत, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ सरकारांनी तत्काळ निर्णय घेत ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे.
यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील कोल्ड्रिफ सिरपचा वापर थांबविण्याचे निर्देश दिले असून अन्न औषध प्रशासन विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत परिपत्रक जारी करत म्हटले की, कोल्ड्रिफ सिरप (फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड, क्लोरफेनिरामाइन मॅलेट सिरप), बॅच क्रमांक SR-13, Mfg. Dt. मे-2025, Exp. Dt. एप्रिल-2027, स्रेसन फार्मा, सुंगुवरचाथिरम, कांचीपुरम जिल्हा, तामिळनाडू यांनी उत्पादित केले आहे. यामध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) या विषारी पदार्थाची भेसळ केल्याचा आरोप आहे.
हे लक्षात घेता, सर्व परवानाधारक आणि जनतेला कोल्ड्रिफ सिरप, बॅच क्रमांक SR-13 ची विक्री त्वरित थांबवण्याचे आणि विलंब न करता स्थानिक औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर उत्पादन बॅचचा साठा गोठवण्यासाठी तात्काळ सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारकडून टोल फ्री क्रमांक जारी
राज्य सरकारकडून 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा jchq.fda-mah@@nic.in या ईमेलवर किंवा 9892832289 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्ड्रिप सिरप हे मे 2025 ते एप्रिल 2017 या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक वर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.












