शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता ‘इतक्या’ हेक्टरपर्यंतच मिळणार मदत? सरकारने नुकसान भरपाईचे नियमच बदलले

मे 31, 2025 5:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२५ । मे महिना हा सर्वात उष्ण महिना समजला जातो. या महिन्यात तापमान ४५ अंशापर्यंत जात असल्याने अंगाची लाही लाही होते. परंतु यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला दिसून आला. राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या वादळी पावसामुळे हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याने बळीराजा मोठा संकटात सापडला. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना सरकारने नुकसान भरपाईचे निकष बदलले आहेत. आता केवळ 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत, पण सरकारच्या या निर्णयाचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसणार आहे.

damage compensation rules

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत बदल करण्यात आला आहे. त्याशिवाय कमाल तीन हेक्टरऐवजी आता दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्यात येणार आहे, राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. २७ मे २०२३ रोजी तत्कालीन सरकारने सर्वात आधी नियम बदलून दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचं जाहीर केले होते. एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यावर २०२४ मध्ये मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादा यात वाढ केली होती. पण तो निर्णय रद्द करून आता पुन्हा २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार मदत केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

नुकसान भरपाईचा निकष 3 हेक्टर वरून दोन हेक्टर करण्यात आला? याबाबत मंत्री बावनकुळे यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, ‘केंद्र सरकारच्या निकषासारखेच राज्य सरकारचे निकष आहेत. फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल, या उद्दिष्टाने तीन हेक्टर वरून दोन हेक्टरचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे जास्त शेतकऱ्यांना आणि गरजूंना मदत मिळू शकेल.’

महाराष्ट्रात अवकाळीमुळे झालेल्या नुकसान भरपाई करिता मुख्यमंत्र्यांनी एक स्पष्ट धोरण ठेवलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिला विषय हाच राहणार आहे. गेल्या मंत्रिमंडळातही सविस्तर चर्चा नुकसान आणि मदतीवर झाली आहे. केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह राज्य सरकारच्याही नियम असतात. खावटी दहा हजार देण्याचे निर्णय घेतले आहे, पुढच्या कॅबिनेट पर्यंत संपूर्ण राज्यात काय नुकसान झालं याचा सविस्तर आढावा मंत्रिमंडळात येईल. त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनतेला नुकसान भरपाई लवकरच मिळेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment