⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं; मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन केलं हे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । राज्यात मागील काही महिन्यापासून नियंत्रणात असलेली कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसतेय. वाढत्या बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केलं आहे. कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत कोविड रुग्णसंख्या वाढते आहे याबाबत आढावा घेऊन चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राज्यातील जनतेने मास्क वापरणे सुरू ठेवावे. कोरोना अजून गेलेला नाही आणि हे लक्षात घेऊन लोकांनी कोविड-19 विरुद्धची सुरक्षा कमी करू नये. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असले तरी अद्यापही विषाणूचा पूर्णपणे नायनाट झालेला नसल्याने सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, बुधवारी राज्यात 470 कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे आढळून आली, जी 5 मार्चनंतरची सर्वाधिक संख्या आहे. यापैकी 295 प्रकरणे मुंबईत नोंदवली गेली, जी 12 फेब्रुवारीनंतर एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुंबईत कोविड-19 प्रकरणांमध्ये 52.79 टक्के वाढ झाली आहे, तर पालघर जिल्ह्यात 68.75 टक्के, ठाणे जिल्ह्यात 27.92 टक्के आणि रायगडमध्ये 18.52 टक्के वाढ झाली आहे.

राज्याचा साप्ताहिक कोरोना विषाणू पॉझिटिव्ह दर 1.59 टक्के असून, मुंबई आणि पुणे राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्ह नोंदवत आहेत. ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या फक्त एक कोविड-19 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, तर 18 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. सध्या 18 वर्षांवरील 92.27 टक्के लोकांना लसीकरणाचा पहिला डोस मिळाला असून आरोग्य विभागाला ही प्रक्रिया जलद करण्यास सांगितले आहे.