अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? जळगावच्या ‘या’ आमदाराला मिळणार संधी..

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२३ । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत नवीन सरकार स्थापन केलं होते. यानंतर राज्याचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार तब्बल 39 दिवसांनी झाला होता. त्यांनतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे शिंदे- फडणवीस सरकारकडून सांगण्यात येत होते.

आता अशातच राज्याचा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आलीय असून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेसह संभाव्य मंत्र्यांची नावेही समोर आली आहेत. या संभाव्य यादीत जळगावच्या एका आमदाराचा देखील समावेश आहे. तसेच संजय शिरसाट तसेच बच्चू कडू यांचाही समावेश आहे.

या तारखेला होणार विस्तार?
दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले होते. अशातच आता मंत्रि मंडळाचा विस्तार हा २३ किंवा २४ मे ला घेण्याची चर्चा आमदारांमध्ये सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील मंत्र्यांची यादीही तयार केली असून ज्यात शिंदे गटाचे एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांची देखील वर्णी लागणार असल्याचे समजते.

संभाव्य मंत्र्यांची नावे?
भरत गोगवले( जलसंधारण मंत्री), संजय शिरसाठ (परिवहन किंवा समाज कल्याण) बच्चू कडू (दिव्यांग मंत्री)प्रताप सरनाईक , सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमन आबा पाटील या आमदारांची वर्णी लागण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे.