MBA करण्यासाठी जळगावी आला, पण भाड्याच्या खोलीमध्ये नको ते करून बसला
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२४ । एमबीए करण्यासाठी मध्य प्रदेशातून जळगाव शहरात आलेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. सौरभ विकास कोल्हे (२३, मूळ रा. दाभियाखेडा, मध्यप्रदेश, ह.मु. गंधर्व कॉलनी) असे मयत तरुणाचे नाव असून त्याच्या आत्महत्यामागील कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, सौरभ कोल्हे याने वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर तो एमबीए करणार असल्याने जळगावात आला होता. यासाठी तो गंधर्व कॉलनीमध्ये एका भाडेतत्वावरील खोलीमध्ये राहून पुढील शिक्षणासाठी तयारी करत होता. गुरुवारी संध्याकाळी सर्व मित्र खोलीबाहेर बसलेले असताना सौरभ आत गेला व मागील खोलीमध्ये त्याने गळफास घेतला. रात्री साडेनऊ वाजता त्याचे मित्र जेवणासाठी बोलवण्यासाठी गेले असता त्यांना सौरभ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्या वेळी त्यांना मोठा धक्का बसला.
या विषयी त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना व पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहचले व त्यांनी सौरभला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी या तरुणाला मयत घोषित केले. या दरम्यान आसोदा येथे राहत असलेले सौरभचे मामादेखील तेथे पोहचले. सौरभ हा नियमित अभ्यास करायचा व कोणत्याही तणावात नव्हता, तरीदेखील त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, हे समजू शकले नाही. मयत सौरभचे आई-वडील शेतकरी असून मध्यप्रदेशातील दाभियाखेडा येथे राहून ते शेती करतात. त्याला एक लहान भाऊ असून तो गावाकडेच असतो जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.