गुरूवार, नोव्हेंबर 30, 2023

दुर्दैवी : पोलिसांच्या वाहनावर कोसळला वृक्ष, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार, तिघे जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज | २९ जून २०२३ | जळगाव जिल्ह्याला आषाढी एकादशीच्या दिवशी एका अपघाताने सुन्न केले आहे. गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कासोदा ते एरंडोल रस्त्यावर पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला असून एक अधिकाऱ्यासह कर्मचारी जागीच ठार झाले आहेत. अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना जळगाव हलविण्यात आले आहे. धावत्या वाहनावर वृक्ष पडल्याने हा अपघात झाला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी गुरुवार रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शासकीय वाहन क्रमांक एमएच.१९.एम.०७५१ ने कासोदाकडून एरंडोलकडे येत होते. अंजनी धरणाच्या अलीकडे वैष्णवी रसवंतीजवळ अचानक एक मोठा चिंचेचा वृक्ष वाहनावर कोसळला. अपघात इतका भीषण होता की त्यात सहाय्यक निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे जागीच ठार झाले.

अपघातात निलेश सूर्यवंशी, चंद्रकांत शिंदे, भरत जठरे हे तिघे कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ लागलीच जळगाव हलविण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी घडलेल्या घटनेने पोलीस दलासह जिल्हा सुन्न झाला आहे.