⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | लकी ड्रॉ भिशीने श्रीमंत ‘मालामाल’, गरीब मात्र ‘कंगाल!’

लकी ड्रॉ भिशीने श्रीमंत ‘मालामाल’, गरीब मात्र ‘कंगाल!’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । शहरासह जिल्ह्यात सध्या भिशीचा एक प्रकार जोरात सुरू असून तो म्हणजे लकी ड्रॉ भिशी. नेहमीच्या भिशीपेक्षा काहीसा वेगळा असलेला हा प्रकार गरिबांना कंगाल करतोय तर श्रीमंतांना मालामाल करतो आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला या भिशीमुळे तात्पुरती मदत तर होते परंतु त्याला भरावी लागणारी रक्कम कधी कधी दुप्पट होऊन बसते.

एक गट मिळून भिशी टाकणे आणि ठराविक कालावधीनंतर उघडणे हे प्रकार आपल्याकडे नेहमी सुरू असतात. हजारोपासून लाखोंपर्यंत आकडे असलेल्या या भिशी पद्धतीचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार जो नेहमी खेळतात आणि प्रचलित आहे. एक गट निश्चित केलेली रक्कम दरमहा, पंधरावाड्याला जमा करतो आणि ठरलेल्या तारखेला ईश्वरचिठ्ठी प्रकाराने लाभार्थी निवडला जातो. दुसरा फार कमी लोकांना माहिती असलेला प्रकार म्हणजे लकी ड्रॉ भिशी पद्धत. लकी ड्रॉ भिशीत एक गट दरमहा, पंधरवाड्याला ठरलेली रक्कम जमा करतो. निश्चित तारखेला भिशी उघडताना ईश्वरचिठ्ठी काढली जाते. भिशी लागलेल्या व्यक्तीला ती नको असल्यास भिशीचा लिलाव केला जातो. लिलावात भिशीची मूळ रक्कम सोडून कमी रक्कम लावली जाते, ज्याची रक्कम सर्वात कमी त्याला ती रक्कम देण्यात येते. उदा. १० हजार रुपये महिन्याप्रमाणे १० जणांनी १ लाखांची भिशी निश्चित केलेली असल्यास ती भिशी ठरलेल्या तारखेला काढण्यात येते. भिशीसाठी गरजूंनी लिलावात बोली लावल्यास ती रक्कम कमी-कमी होत जाते. कधी कधी तर भिशी निम्म्या रकमेवर म्हणजे ५० हजारात ठरते. गरजूला निकड असल्याने तो ५० हजारात समाधान मानतो पण त्याला १ लाख भरावे लागणार असतात. उर्वरित ५० हजार इतर ९ सदस्यांमध्ये विभागले जातात.

भिशीवर लक्ष ठेवणार कोण?
लकी ड्रॉ भिशी पद्धत आज अनेकांचे आयुष्य उध्वस्त करीत आहे. बँक आणि खाजगी फायनान्स कंपनीपेक्षा अधिक व्याजदरनुसार गरजूला रक्कम भरावी लागते. मुळात भिशी ही केवळ विश्वासावर चालणार व्यवहार आहे. भिशीत ज्याचे नुकसान होते तो कधीच पोलिसांच्या दरवाजावर किंवा प्रशासनाकडे दाद मागत नसल्याने इतरांचे फावले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.