⁠ 
सोमवार, मे 20, 2024

निस्वार्थ भावनेने चालणारे निःशुल्क कोविड सेंटर ठरत आहे कोरोनाग्रस्तांचं हक्काचं घर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । एकीकडे कोरोना महामारीचा प्रकोप वाढत असताना दुसरीकडे मात्र मानवतेचे दर्शन घडविणारे व माणुसकी रुजविणारे चित्र जळगाव येथील लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटर मध्ये बघायला मिळत आहे. लोकसंघर्षच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी ज्या समर्पित भावनेने कार्यकर्ते घेत आहेत ती अत्यंत कौतुकास्पद व अनुकरणीय बाब आहे. 

सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आणि आवश्यकता भासल्यास मध्यरात्रीसुद्धा न थकता, न कंटाळता येथील सर्व कार्यकर्ते रुग्णांना प्राधान्य देऊन औषध, जेवण, चहा, नाश्ता, पौष्टिक आहार इत्यादी सेवा पूर्णवेळ करत आहेत. आपुलकीने रुग्णांची विचारपूस करणे, संवादातून सकारात्मकता वाढविणे, रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी प्रोत्साहन देणे यासोबतच निर्भयपणे कोविडग्रस्त ज्येष्ठ अन्य रुग्णांची सेवा करत आहेत. आपल्या आपुलकीच्या व समर्पणशील सेवेने त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत.

पैशांअभावी कोणीही रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये यासाठी लोकसंघर्ष मोर्चाने पुन्हा कोविड  केअर सेंटर सुरु केले. पहिल्याच दिवशी शंभराहून अधिक रुग्ण सेंटरमध्ये दाखल झालेत. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हे सेंटर झोकून देऊन रुग्णसेवा करीत आहे. आपल्याला झालेली कोरोनाची लागण कुटुंबात इतर कुणाला होऊ नये या काळजीने चिंतीत असलेल्या कोविड रुग्णांना घरासारखी हक्काची व आपुलकीने काळजी घेणारी सोय आणि सुविधा लोकसंघर्ष मोर्चाने जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये मिळत आहे. जणू हे एक मोठे कुटुंबच आहे अशी भावना सर्वांमध्ये दिसते.

मदतीचा ओघ आणखी वाढण्याची गरज

कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात लोकसंघर्ष मोर्चाने लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशनसोबत सुरु केलेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटर चालविले होते.  त्यावेई असलेल्या भीतीदायक वातावरणातही कार्यकर्त्यांनी रुग्णसेवेसाठी जीवाचे रान केले होते. समाजातील अनेक घटकांच्या मदतीमुळे शेकडो रुग्णांना हक्काचा आधार मिळाला होता. आता दुसऱ्या टप्प्यात सुरु झालेल्या लोकसंघर्ष मोर्चा कोविड सेंटरमध्येही सर्वच स्तरातील रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड सेंटरचे कार्य समाजातील दानशूर व संवेदनशील व्यक्तींच्या सहकार्यामुळेच सुरु असल्याची भावना प्रतिभाताई शिंदे यांनी व्यक्त केली. लहान, मोठ्या स्वरूपात, श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय अशा स्तरातून आपापल्या क्षमतेप्रमाणे आर्थिक सहकार्य उपलब्ध होत आहे. परंतु दिवसेंदिवस शहर व जिल्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मोठ्या स्तरावर आर्थिक मदतीची गरज असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांच्या हिमतीला व समर्पणाला सलाम

वेदना समजल्याशिवाय संवेदना जागी होत नाही. लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटरसाठी सचिन धांडे, भरत कर्डिले, विशाल भाई, सुमित साळुंके,दामोदर भारंबे, कलिदर तडवी, अजय बारेला, किरण, प्रमोद भाऊ, राजेश पाटील तसेच डॉक्टरांच्या मार्गदर्शनात परिचारिका, सहाय्यक, सेवक व कार्यकर्ते अत्यंत मनोभावे रुग्णसेवा करीत आहेत. कलिंदर तडवी, वॉर्ड बॉय म्हणून काम पाहणारे अजय मनोरे आणि विकास वाघ हे निःशुल्क सेवा देत असून घरातल्या माणसांसारखी मोठ्या हिमतीने व समर्पणाने कार्य कार्य करत आहे. कोणताही नातं नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने सुरु असलेली रुग्णसेवा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या हिमतीला व समर्पणाला मी सलाम करते, अशा भावना प्रतिभाताई शिंदे यांनी व्यक्त केल्या.