⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

एका जळगावकराचे पत्र : देवेंद्रजी , जळगावकरांची विकासाची तहान भागवा !”

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२३ । भाजपचे जळगाव महानगर सरचिटणीस डॅा राधेश्याम चौधरी यांनी देवेंद्रजी , जळगावकरांची विकासाची तहान भागवा ! असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. त्यात यांनी जळगावची व्यथा मंडली आहे. वाचा काय लिहिले आहे पत्रात

मा देवेंद्र जी आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आहात.आपण सरकारसोबत जनतेच्याही मनातल्या भावनांचा अर्थ आणि शास्त्र उत्तमपणे जाणतात.अनेक शहरांत पायाभूत सुविधा,महत्वाकांक्षी प्रकल्प यांच नियोजन करून ते पूर्णत्वास नेण्याची आपली खासियत आहे.जळगाव जिल्ह्यातील मतदार स्थानिक स्वराज्य संस्था,लोकसभा,विधानसभा या सर्वच स्तरावर भाजपाच्या पाठीशी गेली अनेक वर्षे भक्कमपणे उभा आहे.भाजपाचा कार्यकर्ता म्हणून जनतेच्या भावना आपल्यापर्यंत या पत्राद्वारे पोहोचवत आहे. याआधी देखील आर्थिक संकटात सापडलेल्या जळगाव मनपाला मा.गिरीश भाऊ महाजन यांच्या आग्रहास्तव एकरकमी सव्वा दोनशे कोटी रु . कर्जमुक्तीसाठी तर २५ कोटी व १०० कोटी रू.चा भरीव निधी विकासकामांसाठी मा देवेंद्रजी आपण दिलाय.म्हणूनच आपल्याकडून आम्हाला अपेक्षावजा खात्री आहे कि लाखो जळगावकरांच्या भावनांची दाखल घेऊन आपण आम्हाला दिलासा देणारे निर्णय या अर्थसंकल्पात घ्याल. त्यासाठीच आपल्या समोर सामान्य जळगावकरांची कैफियत मांडण्यासाठी हा पत्र प्रपंच.
एके काळी नाशिक व औरंगाबाद या शहरांपेक्षा उद्योग,व्यापार,आर्थिक स्थिती उत्तम असलेल जळगाव शहर गेल्या एक दोन दशकात या शहरांपेक्षा विकासात तर मागासले आहेच पण येथील मुलभूत नागरी सेवांचीही पुरती धुळदाण उडाली आहे,मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीअभावी युवकांची स्थलांतरे होताहेत.यावर आम्हा सर्व जळगावकरांच एकमत होईल. साहेब ,अंदाजे ४० लाखाच्या आसपास लोकसंख्या, २ खासदार, १२-१३ आमदार असलेला,केळी-कापूस-उस आदि पिकांनी समृद्ध असलेला, उद्योग-व्यापाराला पोषक परिस्थिती ,वातावरण असलेला जिल्हा म्हणून आमच्या जळगावची ओळख असुनही गेली दोन दशके जिल्हाभर सकारात्मक परिणाम करणारा कोणताही प्रकल्प जळगावात आला नाही यापेक्षा जास्त दुर्दैव काय म्हणावं जळगावच व जळगावकरांच ?


चारही दिशांना जाता येईल, चोवीस तासात देशाच्या काना कोपर्यात पोहोचता येईल असे महामार्ग,लोहमार्ग व विमानतळ असे सर्वोत्तम भौगोलिक स्थान जळगावला लाभले आहे.पाणी व वीज मुबलक आहे.विद्यापीठासह अनेक व्यावसायिक महाविद्यालयांमुळे कुशल मनुष्यबळाची तर जळगावच्या लगत शंभरावर खेड्यांतून पुरेसे अकुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे.मग एवढ सर्व काही अनुकुल असतांना नविन लहान मोठे व्यापार -उद्योग का नाही येवू शकले जळगावला ? का हजारोंच्या संख्येने तरूण ,युवक रोजगारासाठी स्थलांतरे करत आहेत.यासारखे असंख्य प्रश्न आम्हा लाखो जळगावकरांना अस्वस्थ करत असतात.

उद्योग व्यापाराला जे जे लागत ते ते सर्व काही आमच्याकडे आहे,गरज आहे फक्त सरकारच्या पाठबळाची ! इंजिनिअरींग,वैद्यकिय ,फार्मसी,आयटीआय,मॅनेजमेंट,रिसर्च आदि अनेक महाविद्यालयांसह अनेक व्यावसायिक,विशेष कोर्सेस असलेल विद्यापीठ दरवर्षी हजारो उच्च गुणवत्ताधारक,कौशल्यधारक तरूण
पद्वीधर निर्माण करतात.परंतु या भूमिपुत्रांना जन्मभूमीची सेवा करण्याची संधी देणारे पुरेसे उद्योग आमच्या जळगावात नसल्याने परागंदा होवून दूरवरच्या शहरात उदरनिर्वाहासाठी मातापिता,जन्मभूमी सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. येथील एमआयडीसी तील उद्योजक दोन दोन ठिकाणी कर भरतात पण त्याबदल्यात हक्काच्या मुलभूत सुविधांसाठी तरीही उपाशीच याच फार दु:ख होत.
म्हणून जळगावकरांच्या मनातील खालील अपेक्षा,मागण्या मा.देवेंद्रजी आपल्याकडे करतो.


१) संपूर्ण शहरात मुख्य रस्ते व गल्लीबोळातील रस्त्यांची चाळण झालेली आहे.जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी ५०० कोटी रू चा निधी मिळाला पाहिजे.
२) राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे मार्ग यावरील पाळधी ते दीप नगर या संपूर्ण परिसरात आय टी ,टेक्सटाईल,केळी प्रक्रिया उद्योगांचे हब,पार्क,एखादा औद्योगिक कॅारीडोअर घोषित करून जळगावच्या पोषक भौगोलिक स्थितीचा वापर करीत हजारो तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी द्यावी.
३) नविन उद्योग येणे जसे गरजेचे आहे तसे संकटात सापडलेल्या,विद्यमान उद्योगांना बळ देण्यासाठी विदर्भ,मराठवाडा यांच्या उद्योगांच्या धर्तीवर विद्युत बीलात विशेष सवलत द्यावी ही अत्यंत रास्त मागणी करीत आहोत.
४) जिल्ह्यासह ६ तालुक्यातील शेती व शेतकरी यांना उपयुक्त अशा पाडळसरे धरणाच्या कामाला गती देण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करावी.
५) चटई उद्योगांना निर्यात करावरील सवलत ,सुट मिळाली पाहिजे.या उद्योगांना चालना देणार्या धोरणात्मक घोषणा,निर्णय व्हावेत .
६) आपल्या सरकारच्या काळात मा गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मेडीकल हब साठी भरीव आर्थिक तरतूद करून तो प्रकल्प तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी पावले उचलावीत.
७)जिल्ह्यात पद्मालय ,उनपदेव,आदिशक्ती मुक्ताई मंदिर,झुलते मनोरे ही आध्यात्मिक ,ऐतिहासिक तर वाघुर ,गिरणा,हतनूर ,निंबादेवी आदि धरणे व लगतच्या जिल्ह्यात अजिंठा लेणी ,लोणार सरोवर आदि पर्यटन स्थळे आहेत. या सर्वांना जोडून विशेष पर्यटन सर्किट विकसित करण्याची योजना जाहीर करून विकसित करावी.
८) वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट योजना राबवून केळी किंवा कापूस यावर आधारित फूड प्रॉसेसिंग कारखाने उभारावीत.
जनतेचा आवाज ऐकणारे,दु:ख जाणणारे दूरदर्शी नेते म्हणून आपली ओळख आहे.म्हणूनच आपल्याकडे आम्ही आपल गार्हाणे मांडत आहेत.त्या आमच्या जखमेवर फुंकर मारणारे निर्णय आपण नक्कीच येत्या अर्थसंकल्पात घेवून जळगावकरांना सुखद अनुभूतीची संधी द्याल अशी खात्रीवजा विनम्र अपेक्षा बाळगतो. धन्यवाद .
आपला नम्र,
डॅा राधेश्याम चौधरी ,जळगाव.
सरचिटणीस ,जळगाव महानगर भाजपा.