जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहराचे माजी महापौर, सभागृह नेता ललित कोल्हे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केल्याने जयश्री महाजन यांची महापौर पदाची संधी हुकली आणि जिवलग असलेली कोल्हे-महाजन जोडी फुटली होती. दोघांमधील दुरावा दूर होण्याची संधी चालून आली असून सुनील महाजन यांच्या मैत्री खातर ललित कोल्हे पुन्हा घर वापसी करत सेनेचा धागा मनगटावर बांधणार असल्याचे निश्चित झाले आहे.
जळगाव शहरात ललित कोल्हे आणि सुनील महाजन या जोडीच्या मैत्रीची चर्चा नेहमी होत होती. सुनील महाजन यांच्या मैत्रीमुळेच ललित कोल्हे मनसेतून शिवसेनेत दाखल झाले होते. सेनेकडून उमेदवारी निश्चित झालेली असताना ऐनवेळी ललित कोल्हे भाजपात दाखल झाले आणि तिथेच मैत्रीत दुरावा आला. ललित कोल्हे यांच्यासह त्यांचे सर्व नगरसेवक सेनेत आल्याने सेनेची ताकद वाढणार होती आणि महापौर पदाच्या दावेदार मानल्या जाणाऱ्या जयश्री महाजन यांचे पद जवळपास निश्चित झाले होते. कोल्हे यांच्या प्रवेशाने केवळ शिवसेना नेतेच दुखावले नाही तर दोन मित्रांमध्ये दुरावा देखील निर्माण झाला होता.
मैत्रीची ऋण फेडण्यासाठी शिवबंधन
महाजन-कोल्हे जोडीत पडलेली फूट दूर करण्याची संधी नुकतेच चालून आली आहे. जळगाव मनपात सत्तांतरच्या चर्चा सुरू असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपचे अनेक नगरसेवक नॉट रीचेबल आहे त्यातच सेनेने महापौर पदाचा उमेदवार म्हणून जयश्री महाजन यांची उमेदवारी जाहिर केली आहे. आपल्या मैत्रीला जागण्याची हीच नामी संधी असून मैत्रीचे ऋण फेडण्यासाठीच ललित कोल्हे मनगटावर शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत. ललित कोल्हे यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून त्यांच्या सूत्रांनी तशी माहिती जळगाव लाईव्ह न्यूजला दिली आहे.
अर्धांगिनीची भूमिका ठरली महत्वाची
माजी महापौर तथा भाजप मनपा सभागृह नेते ललित कोल्हे हे गेल्यावर्षीच शिवसेनेच्या सरिता माळी यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले आहे. ललित कोल्हे जरी बाहेर शरीराने भाजपचे असले तरी घरी मात्र ते मनाने शिवसेनेचे होऊ लागले होते. ललित कोल्हे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी आणि मैत्रीतील गोडवा पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांच्या अर्धांगिनी सरिता माळी-कोल्हे यांनीच महत्वाची भूमिका निभावली असे बोलले जात आहे.