कुंभ आपलाच आहे, आपण जायचंच ; कुंभाला विरोध करणाऱ्यांना बंजारा समाजातूनच विरोध

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात गोद्री येथे 25 जानेवारी ते 30 जानेवारी 2022 दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभ आयोजित करण्यात आला आहे. साधू संत व महंत या कुंभाचे नेतृत्व करत आहे. अश्यातच काही काँग्रेसशी संबंधित संघटना आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून या कुंभाला विरोध करण्यात आला. पोहरादेवीची महत्व कमी करण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. परंतु या कुंभाचे अध्यक्ष स्वतः पोहरादेवीचे प्रमुख गादीपती पू. बाबूसिंगजी महाराज आहेत हे त्यांना ठाऊक नाही. शिवाय संचालन समितीचे प्रमुख सुद्धा श्री श्याम चैतन्य महाराज आहेत. तसेच सर्व प्रमुख पदावर आणि आयोजन समितीवर बंजारा समाज बांधव आहेत. त्यामुळे आता बंजारा समाजातूनच या विरोध करणाऱ्या संघटनांना विरोध होऊ लागल्याने चित्र दिसत आहे.

धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक चळवळींचे अभ्यासक ऍड काशिनाथ राठोड यांनी आपल्या समाजाची भूमिका घेऊन विरोध कारणाऱ्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय. शिवाय त्यांनी कसलाही भेद आणि विरोध न करता बंजारा समाजाच्या उत्थानासाठी सर्वांनी मिळून सहभागी झाले पाहिजे असे आवाहन केले आहे.

जय सेवालाल बंधु भगिनी आणि मातांनो, थोडं विचार करू. अजच्या घडीला बंजारा समाजाचे लोक सर्व पक्षात आहेत. कोण काय करतंय हे आपण बघतोय. आजच्या आमच्या समस्या काय आहेत? गोर समाजाच्या मुली विकल्या जात आहेत. तांड्यातांड्यावर धर्मांतरे होत आहेत. हुंडा प्रथा गरीबांचा जीव घेत आहे. अंधश्रद्धा कमी होत नाहीयेत. 15 कोटीपेक्षा जास्त संख्या असूनही समाजात बलशाली नेतृत्व नाही. मुली/ महिला लव जिहादच्या जाळ्यात अडकत आहेत. कोणताही पक्ष आपल्या समाजाकडे लक्ष द्यायला तयार नाही. अनेक वर्षांपासून आपला केवळ वापर करून घेतला जातोय. हे कशामुळे होतंय? आम्ही सामाजिक दृष्ट्या खूप दुर्बल आहोत याची जाणीव तरी आपल्याच समाजातील पांढरपेशा नेत्या पुढाऱ्यांना आहे का? समाजात फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोण प्रयत्न करतंय?

गेली शेकडो वर्षापासून समाज संघटित होत नाही. जेव्हा केव्हा कुणी समाज बांधव एकजुटीसाठी निघाला की त्याला अडथळे आणले जातात. आज अनेक तांडे ख्रिश्चनमय झाले आहेत. ते ख्रिस्ती झाल्यावर सेवालाल महाराजांना मानत नाहीत हे सत्य आहे की नाही?
गोर समाजाची मक्तेदारी कुण्या पक्षाने विकत घेतली आहे का ? ज्या कार्यक्रमात ज्या उत्सवात, मेळाव्यात फक्त गोर समाज पुढाकार करणार आहे त्याचा विरोध करून काय साध्य होणार आहे?
ज्यांना पोट दुःखी आहे त्यांना एवढी वर्षे असे मेळावे करण्यापासून कुणी रोखले होते का? स्वताने होत नाही आणि दुसऱ्याला करू देत नाही असे उद्योग कशासाठी?

हे आयोजन शुद्ध भारतीय गोर बांधवांच्या कल्पनेतून साध्य होत आहे. कुंभाच्या अध्यक्षस्थानी पोहरादेवी येथील प्रमुख गादीपती पूजनीय बाबूसिंगजी महाराज आहेत. भारतात आपले लाखो मंदिरे आहेत म्हणून पोहरागढ चे महत्व कमी झाले असे होत नाही. स्वतः बाबूसिंगजी महाराजांनी याची स्पष्टता दिलीय.

एखाद्या जातीचा, पक्षाचा, संघटनेचा विरोध करणे हे समाजाचे काम नाही. उलट सर्वांसोबत मिळून काम करणे हे समाजाचे काम आहे. कोणताही पक्ष, संस्था आमच्या समाजाच्या हिताचे काम करेल त्याला सहकार्य करणे हेच सर्वांच्या हिताचे आहे. आपल्या संतांच्या नेतृत्वात बंजारा समाजाच्या हितासाठी एवढे मोठे आयोजन होत आहे त्याचे कौतुक झाले पाहिजे. कुण्यातरी निमित्ताने समाज संघटित होत असेल आणि त्याचा उपयोग समाज रक्षणासाठी होत असेल तर पोटदुखीचे काही कारण नाही.

हिंदू समाजात जातीभेद करून समाजाला खालच्या थराला नेण्याचा डाव समाजाने ओळखला आहे. समाजाला सर्व पक्षात जाण्याचा अधिकार आहे तसे सर्व पक्षाला समाजासाठी कार्य करण्याचं त्यांचं कर्तव्य आहे. कुंभविषयी भ्रम पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे पाप मान्यवरांनी करू नये.

सर्व समाज बांधवांनी या भव्य कुंभ मेळाव्यात सहभागी होऊन आपली एकजुटता आणि विराट रूपाचे दर्शन पूर्ण भारताला करून दिले पाहिजे. हा तर आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे की बंजारा कुंभ नावाने अखिल भारतीय स्वरूपाचा कुंभ होतोय. साधू संतांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्या समाजाला मिळावे आणि त्यामधून आपली सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी हा कुंभ होत असेल तर आम्ही भाग्यवान आहोत. आपल्याकडे यजमान म्हणून धर्माने पाहिले आहे.

तसेच कुंभासाठी सर्व समाजातील मान्यवर मंडळी आर्थिक सहयोग करणार आहेत आणि स्वखर्चाने कुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत.बफक्त पैश्यावर ध्यान असणाऱ्या मंडळींनी खोटी माहिती सांगून दिशाहीन वक्तव्य न करता समाजाचे विशाल दर्शन घडविण्यास सहकार्य करणे जास्त योग्य राहील.

आपला समाज उच ,नीच ,काळा गोरा ,श्रीमंत गरीब ,हा पक्ष तो पक्ष असा भेद भाव करत नाही. अश्या महान समाजाला अकारण नावे ठेवून त्यांना अपमानित न केलेलं बरं. कोणतीही जात आपले शत्रू नाही आणि आपण कुण्या जातिचे शत्रू नाही. हे सुत्रच आपल्याला सन्मान मिळवून देईल. कुंभ आपला आहे, आपण जायचंच आहे. हा ऐतिहासिक सोहळा आहे.

धन्यवाद
ऍड. काशिनाथ राठोड,उमरगा.
मो. 7038841444
जय सेवालाल जय हिंद