जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । एखाद्याच्या कुंडलीत मंगळाचा प्रभाव तीव्र असला कि सुरु होते खरी फिराफीर.. मंगळ दोषासाठी मंगल देवतेची, महादेवाची किंवा हनुमानाची पुजा केली जाते. जगाच्या पाठीवर संपूर्ण मूर्ती असलेले मंगळ देवतेचे एकमेव मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आहे. मंगळ देवतेचा आणि हनुमान भगवानचा दिवस देखील मंगळवार आहे. मंगळ ग्रहाचे देवता मंगळदेव हे असून त्यांचा वार देखील मंगळवार आहे. मंगलदोषाच्या शांतीसाठी आपण पूजन करीत असलेल्या मंगळदेवतेची बहुतांश माहिती आपल्याला आजही नसून काही धार्मिक आणि सामाजिक माहितीच्या आधारे आम्ही आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
मंगळ देवता हे भूमी मातेचे पुत्र असून माता सीतेला देखील भूमी मातेची कन्या मानले जाते. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात विश्वातील एकमेव भूमीमातेची मूर्ती आहे. मंगळदेव हे मंगळ ग्रहाची देवता असून त्यांना युद्धाची देवता देखील मानले जाते. मंगळ देवाचा रंग लाल आहे. मंगळाच्या लाल रंगामुळे त्याला अंगारक असेही म्हणतात. मंगळग्रह देखील लाल असून त्याच्या भडक रंगामुळे तो तापट असल्याचे मानले जाते. अनेक ठिकाणी मंगळदेवाला ब्रह्मचारी मानले जाते, परंतु काही ठिकाणी त्यांची पत्नी ज्वालिनी देवी असल्याची मानता आहे. मंगल देवाचा स्वभाव तामस गुणाचा आहे. कुंडलीतील मंगळ धैर्य, आत्मविश्वास आणि अहंकार दर्शवितो.
मंगळ देवाच्या उत्पत्ती कथा
पहिली कथा : मंगळाच्या उत्पत्तीचे पौराणिक वर्णन स्कंद पुराणातील अवंतिका खंडात आढळते. एकेकाळी उज्जयिनी पुरीमध्ये अंधक नावाचा एक प्रसिद्ध राक्षस राज्य करत होता. त्याच्या पराक्रमी मुलाचे नाव कनक दानव होते. एकदा त्या महान पराक्रमी वीराने इंद्राला युद्धासाठी आव्हान दिले, तेव्हा इंद्राने रागाच्या भरात त्याच्याशी युद्ध करून त्याचा वध केला. त्या राक्षसाचा वध केल्यानंतर ते अंधकासुराच्या भीतीने भगवान शंकराच्या शोधात कैलास पर्वतावर गेले. भगवान चंद्रशेखरला पाहून इंद्राने त्याची अवस्था सांगितली आणि रक्षणासाठी प्रार्थना केली, हे भगवान.. मला अंधकासुरपासून संरक्षण दे. इंद्राचे वचन ऐकून शरण आलेल्या वत्सल शिवाने इंद्राला भयभीत केले आणि अंधकासुरला युद्धाचे आव्हान दिले, युद्ध खूप भयंकर झाले आणि त्या वेळी भगवान शंकराच्या डोक्यातून घामाचा एक थेंब अंगारासारखा लाल होऊन पृथ्वीवर पडला. त्यातून लालबुंद भूमिपुत्र मंगळदेवाचा जन्म झाला. अंगारक, रक्ताक्ष आणि महादेवपुत्र या नावांनी त्यांची स्तुती करून ब्राह्मणांनी त्यांना ग्रहांमध्ये स्थापित केले. त्यानंतर ब्रह्माजींनी त्याच ठिकाणी मंगळेश्वर नावाच्या परिपूर्ण शिवलिंगाची स्थापना केली. सध्या हे ठिकाण उज्जैनमध्ये असलेले मंगलनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
दुसरी कथा : ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, वराह कल्पात, राक्षस राजा हिरण्यकश्यपचा भाऊ हिरण्यक्ष याने पृथ्वी चोरून समुद्रात नेली. भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्यक्षाचा वध केला आणि पृथ्वीला पाताळातून बाहेर काढून परात्पर ब्रह्मदेवाने ज्या महासागरावर जग निर्माण केले त्या समुद्रावर ठेवले. पृथ्वी फलदायी रूपात आली आणि वराह रूपात असलेल्या श्रीहरीची पूजा करू लागली. पृथ्वीचे सुंदर आकर्षक रूप पाहून श्री हरी मोहित होऊन दिव्य वर्षापर्यंत पृथ्वीशी खेळले. या योगायोगामुळे कालांतराने पृथ्वीच्या गर्भातून एक भव्य बालक जन्माला आला, ज्याला मंगळ ग्रह म्हणतात. देवी भागवतातही या कथेचे वर्णन आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मंगळ देवतेचे भव्य मंदिर आहे. विश्वातील एकमेव मंगळदेवतेची अखंड मूर्ती आणि भूमीमतेची मूर्ती या मंदिरात आहे. दर मंगळवारी मंदिराला किमान १ लाख भाविक भेट देत असतात. मंदिराचा संपूर्ण इतिहास आजवर कुणालाच पूर्ण माहिती नसला तरी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने भाविकांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. मंदिर संस्थेकडून परिसरात अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. जळगाव, सुरत, अहमदाबाद, भुसावळ येथून रेल्वेने अमळनेरला पोहचता येते. रस्ते मार्गे धुळे येथून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर मंदिर वसलेले आहे.