⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

खुबा सेठचा पुन्हा दिलदारपणा.. शिल्लक १००८ गणेश मूर्तींची खरेदी अन्…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । काल बुधवारी रोजी साधारण रात्री साडे अकराच्या सुमारास, ज्यावेळेला सर्वच ठिकाणी ‘श्रीगणेशा’ची मनोभावे स्थापना झालेली होती आणि ‘श्री गजानन’ची मूर्ती विकणारे मूर्ती विक्रेते यांची राहिलेल्या मूर्त्यांची व्यवस्थित पॅकिंग करण्यासाठीची लगबग सुुरु होती.. काही जणांच्या चेहर्‍यावर चिंता स्पष्ट दिसून येत होती.. त्यातच उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता श्री.खूबचंद साहित्या हे मूर्तीकारांकडे आलेत आणि कोणत्याही प्रकारे भावाची घासाघिस न करता शिल्लक राहिलेल्या सर्व मूर्त्या ते संकलित करीत होते. साधारणत: सुमारे 1008 लहान, मध्यम व मोठ्या मुर्त्या ज्या शिल्लक होत्या त्यांची रक्कम त्यांनी त्या-त्या विक्रेत्याला अदा केली.

काही विक्रेत्यांना अश्रू अनावर झालेत. कारण, त्यांनी सावकाराकडून मोठ्या व्याजाच्या दराने रकमा उचलून त्यांचा संसाराचा गाडा उत्तम चालावा, दोन पैशाचे उत्पन्न त्यांना व्हावे यासाठी रकमांची उचल केलेली होती. यातच वॉटरप्रुफ टेंटचा खर्च, वाहतुकीचा खर्च इत्यादी सर्व खर्च झाल्यानंतर जणू नफा हा राहिलेल्या मूर्तींमध्येच होता आणि त्या मूर्त्या वर्षभर सांभाळायची, पॅकिंग करुन ठेवायची चिंता ही होतीच. अशात श्री.खूबचंद साहित्याच्या निमित्ताने त्यांची चिंता दूर झालेली होती.

हीच भावना शहरातील बळीराम पेठ, शहर पोलीस स्टेशनजवळील परिसर, सिंधी कॉलनी, अजिंठा चौक, आकाशवाणी केंद्रासमोरील रिंग रोड अशा अनेक ठिकाणाहून शेकडो विक्रेत्यांकडून शिल्लक राहिलेल्या ‘श्री गणेश’ मूर्त्या आज गुरुवार, दि. 1 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजेपासून श्री.खूबचंद साहित्या यांच्या सिंडीकेट व अंकल ट्रॅव्हल्सच्या स्वच्छ व सुशोभित केलेल्या वातानुकूलित बसेसमध्ये या सर्व मूर्त्या मनोभावे नेऊन खान्देश मिल कंपाऊंड परिसरातील संत बाबा हरदासराम मार्केट मधील विविध दुकानी व हॉलमध्ये आज सायंकाळी सहा वाजता श्री.रवी गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्याहस्ते विधिवत पूजा-आरती करुन पुढील तीन दिवस सकाळ-संध्याकाळ आरती करुन शनिवारी सायंकाळी 4 वाजता या सर्व मूर्त्या वाहत्या पाण्यात (मेहरुण तलाव नव्हे) विसर्जित करण्यात येणार आहे. या संपूर्ण विषयातील विशेष बाब म्हणजे श्री.खूबचंद साहित्या यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात याअगोदर कधीही ‘श्री गणेशा’ची स्थापना केलेली नाही. मात्र, येणारे पुढील तीन दिवस हा संपूर्ण सोहळा पाळण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे.

सूज्ञ जळगावकर नागरिक म्हणून आपण सर्वांनी या कृतीचे अभिनंदन केले पाहिजे व येथील सुमारे 1008 गणपतींचे दर्शन घ्यायला नक्कीच गेले पाहिजे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर झालेच, धार्मिक भावनाही जपल्या गेल्या व सामान्य विक्रेते होणार्‍या नुकसानीपासून बचावले.