ऐन थंडीत खान्देशात जोरदार पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२४ । जळगाव, खान्देशसह राज्यातील हवामानात पुन्हा बदल झाला. गेल्या काही दिवसापासून हाडं गोठवणारी थंडी पडत असताना मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी कमी झाली आहे. यातच खान्देशातील जळगाव धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
उत्तर भारताकडून थंड वारे अन् दक्षिणेतून येणारे बाष्पयुक्त वारे यांची टक्कर राज्यावर होत आहे. त्यामुळे वरच्या थरांत झोतवारा (जेट स्ट्रीम विंड) वेगाने वाहत आहे. हे वारे वातावरणाच्या खालच्या थरांतही येत असल्याने राज्यात बोचरे वारे, दाट धुके अन् पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, २६ डिसेंबर रोजी जळगाव, धुळे आणि नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर २७ डिसेंबर रोजी अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
खान्देशात थंडी ओसरली
दरम्यान गेल्या काही दिवसापासून खान्देशातील जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला होता. यात धुळ्याचे किमान तापमान ५ अंशापर्यंत गेले होते. तर जळगावचे किमान तापमान ७ अंशापर्यंत घेरले होते. यामुळे हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे जळगावचा किमान तापमानाचा पारा वाढून १५ अंशावर गेला आहे. आगामी काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, हा पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील गहू, हरभरा सारख्या पिकांना लाभदायक ठरू शकतो. शेतकऱ्यांना या पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पाणी मिळेल, ज्यामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते. मात्र काही पिकांना याचा फटकाही बसू शकतो.