⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जिल्हा बँक निवडणूक : सर्वपक्षीय पॅनलवर होणार खडसे-महाजन वादाचा परिणाम

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय एकत्र आले असून दोन बैठकीत जवळपास सर्वच जागांचे निश्चित झाले आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून एकनाथराव खडसे आणि आ.गिरीश महाजन यांच्यात रंगलेल्या शाब्दिक युद्धाचा परिणाम निवडणुकीवर होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून भाजप स्वबळावर मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले असून सर्वपक्षीय पॅनल मैदानात उतरवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतल्याने सर्वपक्षीय नेत्यांची दोन वेळा बैठक झाली. राजकारणातील वैरी समजले जाणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी मंत्री आ.गिरीश महाजन हे देखील दोन्ही बैठकीत सोबत होते. इतकंच नव्हे तर दोघांनी देखील सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीबाबत स्पष्ट आणि एकत्रित असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

जिल्हा बँक निवडणुकीत मी किंवा रोहिणी खडसे हे निवडणूक लढविणार नसल्याचे एकनाथराव खडसे यांनी स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे भाजप नेते आ.गिरीश महाजन यांनी आम्ही विरोधक असून देखील सोबत आहोत. एक-दोन जागेंचा प्रश्न असून तो देखील लवकरच सुटेल असे त्यांनी सांगितले होते. जवळपास सर्वच नेत्यांनी याविषयी एकच प्रतिक्रिया दिली होती. गेल्या तीन दिवसात सर्व काही आलबेल झाले असून माजी मंत्री एकनाथराव खडसे व आ.गिरीश महाजन यांचे चांगलेच फाटले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करीत असून अगदी कुटुंब आणि संपत्तीपर्यंत वाद येऊन ठेपले आहेत.

एकनाथराव खडसेंनी केलेल्या एका वक्तव्यात तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. एकंदरीत दोघांमधील वाद चांगलाच पेटला असून त्याचा परिणाम जिल्हा बँक निवडणुकीवर देखील होण्याची शक्यता आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता असून जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी महाआघाडीचे वर्चस्व आहे. भाजपदेखील कुठेही कमी नसून दोन खासदार आणि आमदारांच्या बळावर जिल्हा बँकेत तगडी स्पर्धा उभी करू शकतात. भाजपने स्वबळाचा नारा दिल्यास महाआघाडीचे काही सदस्य देखील त्यांना मदत करू शकतात. सध्या सुरु असलेल्या शाब्दिक युद्धाच्या कारणाने सर्वपक्षीय पॅनलला धक्का देत ऐनवेळी माजी मंत्री आ.गिरीश महाजन आपला डाव खेळातील आणि स्वतंत्र पॅनल मैदानात उतरवतील अशी शक्यता आहे.