⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जलकुंभ जोडणीचे काम ठप्प

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । शहरात अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम पुन्हा रखडले आहे. शासकीय चुकीच्या धोरणांमुळे या योजनेच्या कामाला पुन्हा फटका बसला आहे. एकीकडे योजना पूर्णत्वास आली असताना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून डीआय पाईपांचा पुरवठा होऊ न शकल्याने अनेक ठिकाणी जोडणी अपूर्णावस्थेत आहे. यामुळे जलकुंभाच्या जोडणीच्या कामावरदेखील परिणाम झाला आहे.

या योजनेच्या कामावर सुरुवातीपासूनच मजीप्रा व मनपा प्रशासनाच्या वादामुळे परिणाम झालेला दिसून येत आहे. आता एकीकडे जलकुंभाच्या कामांसह नळ कनेक्शन देण्याचे काम जोरात सुरू असताना, मजीप्राकडून डीआय पाईपांचा पुरवठा केला जात नसल्याने जलकुंभाचे कनेक्शन मुख्य पाईपलाईनवर जोडण्याचे काम थांबले आहे. राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून यासंदर्भात अंतिम धोरण ठरत नसल्याने अडचण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामाची मुदत संपली आहे. मात्र अजूनही या कामाला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मुदतवाढीसाठी पाठवलेला महापालिकेचा प्रस्तावदेखील स्टेट लेव्हल टेक्निकल कमिटीकडे अडकला आहे.

वाढीव भागातील कामांवर परिणाम

एकीकडे डीआय पाईपांचा पुरवठा नसल्याने कामावर परिणाम झाला असताना, दुसरीकडे शहरातील वाढीव भागातील १६८ कॉलन्यांमधील अमृत योजनेच्या वाढीव प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही योजना पूर्ण होऊ शकत नाही. मनपाने जून महिन्यात हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र, पाच महिन्यांपासून वाढीव कामासाठी मंजुरीची प्रतीक्षा आहे.