जळगावकरांसाठी सुखद बातमी! दोन वर्षांपर्यंत भासणार नाही पाणीटंचाई, वाघुरमध्ये ‘इतका’ आहे जलसाठा?
जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२४ । गेल्या वर्षी काही भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांमधील जलसाठ्यावर परिणाम झाला. हिवाळ्यातच जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून धरणांमधील पाणीसाठा आटू लागला आहे. येत्या काही दिवसांत तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होईल. त्यामुळे शेतीच काय, अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याची स्थिती आहे. मात्र जळगाव शहरवासीयांसाठी सुखद बातमी आहे.
ती म्हणजेच जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात आजअखेर ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, दोन वर्षे पाणीटंचाई निर्माण होणार नाही. या धरणातून शेतीला पाणी दिले तर मात्र एक वर्षच पाणी टिकणार आहे. जळगाव शहराला लागून असलेल्या शिरसोली, वावडदा, वडली, पाळधी या गावांत आठ ते दहा दिवसांतून पाणी मिळते. शहरात मात्र मुबलक पाणीपुरवठा होतो.
न चुकता दोन दिवसांआड पाणी मिळते. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याचीही शक्यता नाही. सुदैवाने शहराला पाणीटंचाईची झळ बसलेली नाही. पाण्याची काटकसर केली तर पाणीसाठा जास्त दिवस पुरेल; परंतु त्याबाबत खबरदारी घेताना तरी कोणी दिसत नाही. रोज एक लाख लोकांना पुरेल इतके पाणी शहरात वाया जात आहे. एकीकडे पाण्याची अशी नासाडी होतेय, तर दुसरीकडे काही भागांत पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे
वाघूर धरणात ८१.०५ टक्के पाणीसाठा
वाघूर धरणात आजच्या स्थितीला ८१.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शेतीला पाणी दिले नाही तर दोन वर्षे पाऊस झाला नाही तरीदेखील पाणीटंचाई निर्माण होणार नाही; मात्र शेतीला पाणीपुरवठा झाला तर वर्षभरातच पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. अर्थात, पावसाळ्यात ती भरही निघू शकते