⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

Jalgaon Politics : महाजनांची परिपक्वता की वादळापूर्वीची शांतता!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींना जिल्ह्यातील राजकारण देखील ढवळून निघाले आहे. शिवसेनेत तर अद्यापही कोणता झेंडा घेऊ हाती? असा विचार करीत अनेक कार्यकर्ते संभ्रमात आहेत. जळगावचे बंडखोर तर देव पाण्यात टाकून बसलेत. कुणी उघडपणे शिंदेंची (CM Eknath Shinde) बाजू घेताय तर कुणी (Uddhav Thackeray) ठाकरेंची. सर्व घडामोडीत सध्या एकच व्यक्ती शांत आहे ती म्हणजे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन. स्वतः विरोधी पक्षनेते, पत्नी महापौर, जिल्हा बँक आणि ग.स.सोसायटीच्या संचालिका असे सर्व असताना महाजन यांनी आपली महाजनकी न दाखवता संयम बाळगला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महाजनांच्या (Sunil Mahajan) या चुप्पीचा अर्थ त्यांची परिपक्वता समजावी की वादळापूर्वीची शांतता हेच कळत नाही.

जळगाव शहर मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन व महापौर जयश्री महाजन (Jayashri Mahajan) यांचे नाव अलीकडच्या काही वर्षात अचानक प्रकाशझोतात आले. गेल्या पंधरा वर्षापासून जळगावच्या राजकारणात सक्रिय असलेले सुनील महाजन हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक समजले जातात. एखाद्याशी एकनिष्ठ राहिल्यावर काय फळ मिळते हे महाजनांना आता दिसून येत आहे. सुरेशदादा जैन (Suresh Jain) यांच्यासोबत राहत असल्याने शहराच्या राजकारणात मोठी जबाबदारी महाजन दाम्पत्यावर सोपविण्यात आली. निष्ठेचे फळ त्यांना याच कालखंडात मिळाले.

सुनील महाजन आज जरी शिवसेनेत दिसून येत असले तरी त्यांचे सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहे. राज्याचे जेष्ठ नेते सुरेशदादा जैन, जेष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे (Eknath Khadse), माजी मंत्री आ.गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या पठडीत महाजन आजवर मोठे झाले आहेत. नुकतेच काही वर्षात त्यांना पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आ.गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांचे देखील मार्गदर्शन लाभले. शिवाय जेष्ठ नगरसेवक कायम त्यांच्या सोबतच आहेत. एकंदरीत काय तर महाजन शिष्य बनून सर्वांना गुरू करीत आहेत. सर्वांच्या सहकार्याने पुढे जाण्याचा त्यांचा आजवरचा फंडा आहे. राज्यातील मोठया घडामोडीत देखील महाजन यांनी एकही उलट वक्तव्य केलेले नाही. शहरातील मोजके बंडखोर राज्यात सत्तांतर काय झाले आवाज वाढवून बोलू लागले. नेते थेट पक्षप्रमुखांवर टीका करताय, अशा सर्व परिस्थितीत संयम बाळगत शांतता ठेवणे म्हणजे परिपक्वताच म्हणावे लागेल.
हे देखील वाचा : नाथाभाऊंची इच्छा होती कि सुरेशदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे

लेवा समाजाचा शहरातील मोठा चेहरा
जळगाव शहराच्या राजकारणात आजवर लेवा पाटील समाजाचे मोठे वर्चस्व राहिले आहे. भाजपकडे लेवा समाज प्रतिनिधी म्हणून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्यासह काही उद्योजक व इतर जेष्ठ पुढारी देखील आहेत. भाजपच्या तुलनेने राष्ट्रवादी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसे (Adv.Rohini Khadse) आणि काँग्रेसकडे माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील (Dr.Ketki Patil) अशी नावे चर्चेत आहेत. दोघांची नावे शहरासाठी घेतली जात असली तरी त्यांचा शहराशी थेट संबंध नाही. शिवसेनेकडे सध्या विद्यमान महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashri Mahajan) यांचा मोठा चेहरा आहे. उच्चशिक्षित आणि सोबतच शहराच्या राजकारणात सक्रिय असल्याने त्यांना शहराची सर्व माहिती आहे. लेवा पाटील समाजाकडून देखील त्यांना पाठिंबा आहे शिवाय पक्षश्रेष्ठींचे बळ आहेच. नुकतेच पार पडलेल्या आक्रोश मोर्चात देखील महाजन दाम्पत्य आघाडीवर होते. पक्षाच्या अडचणीच्या काळात देखील ते लढवय्या शिवसैनिकांची भूमिका पार पाडत आहे.
हे देखील वाचा : जळगावकरांना सुरेशदादांची आठवण पुन्हा येतेय; व्यक्तीप्रेम नव्हे शहराच्या विकासाशी आहे थेट संबंध…

शहराच्या राजकारणाचे छुपे पत्ते महाजनांच्या खिशात
राज्यात आज शिवसेनेत उभी फूट पडली असली तरी गेली अडीच वर्ष त्यांची सत्ता होती. दुसरीकडे जळगाव शहर मनपात १४ महिन्यापासून शिवसेनेची सत्ता आहे. जळगाव शहराच्या राजकारणात महापौर पद आणि विरोधी पक्षनेते पद हाती आल्यापासून महाजन दाम्पत्य अधिक सक्रिय झाले होते. दीड वर्षात कोणत्या नेत्याने कसा निधी आणला, कुणी कसा अडथळा निर्माण केला. पक्षातील कोणत्या नेत्याने त्रास दिला, निधी रोखण्यात आता कोण पुढाकार घेते आहे याची सर्व कल्पना महाजनांना आहे. मनपात कोणत्या मजल्यावर कुणाची खिचडी शिजली याची सर्व माहिती महाजनांना आहे. जळगाव मनपातील राजकारण म्हणजे आज याच्या कानात कुजबुज तर उद्या त्याच्या कानात कुजबूज असे आहे. कोणी कुठेही जाऊन पसरले तरी मनपाच्या १७ व्या मजल्याच्या अँटीचेंबरमध्ये जे पत्ते उलगडले गेले ते सध्या तरी सुनील महाजनांच्या खिशात आहे. महाजन शांत असले तरी ती त्यांची परिपक्वता आहे किंवा वादळापूर्वीची शांतता असे देखील म्हणता येईल. जर येणाऱ्या काळात वादळ आले तर सर्व पालापाचोळा बाहेर पडेल हे मात्र निश्चित आहे.