जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे संकट कायम असून आजही राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई वेधशाळेकडून आज जळगावसह दहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सोलापूर सोडून उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे मध्य महाराष्ट्रात हवेत चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे वातावरणातील खालचा जो भाग आहे, तिकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे असतात. वरच्या थरात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वारे असतात. अशी परिस्थिती ढगाळ वातावरणासाठी तथा विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्यासाठी पूरक असते. मागील काही दिवापशासन मागील काही दिवसापासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आज या जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई वेधशाळेनं आज जळगावसह नाशिक, छ. संभाजीनगर जालना, अहिल्यानगर, पुणे सातारा, बीड, आमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तविली आहे. या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्याना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे .
दरम्यान, सध्या ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यातील तापमानात घट झाली. मंगळवारी जळगावचे तापमान ३९ अंशांवर होते. त्यामुळे फारसा उकाडा जाणवत नव्हता. सायंकाळी आकाश भरून आले होते. पण पाऊस झाला नाही. आता बुधवारी (२ एप्रिल) पुन्हा एकदा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली. जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होणार असल्याचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. ३ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. दुपारी आणि रात्रीच्या वेळेस पावसाची शक्यता आहे. ६ एप्रिलनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा बसणार.