जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) तापमानात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. दरम्यान, उत्तरेकडील थंड (Cold) वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली असून यामुळे जळगावमध्ये गारठा पुन्हा परतला आहे. जळगावचे सोमवारी ११ अंशावर असलेलं किमान तापमान मंगळवारी घसरून ८.२ अंशपर्यंत पोहोचले. आगामी दोन दिवस जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला सोबतच तापमानातही घसरण होणार आहे. मात्र ११ जानेवारीपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज आहे. Jalgaon Weather Update
जळगाव जिल्ह्यातील वातावरणाची स्थिती पाहिली तर ढगाळ वातावरण व त्यानंतर पुन्हा थंडी अशी स्थिती राहिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात थंडीचा कडाका वाढला. मात्र, त्यानंतर पुन्हा फेंगल चक्रीवादळामुळे पावसाची स्थिती निर्माण होऊन थंडी गायब झाली. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला. परंतु डिसेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सावटामुळे थंडी पुन्हा कमी झाली होती.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून आज ८ ते १० जानेवारीदरम्यान रात्रीच्या तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. रात्रीचा पारा ६ ते ७ अंशापर्यंत खाली जाऊ शकतो. मात्र, ११ ते १५ जानेवारीपर्यंत पुन्हा जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाचीही शक्यता आहे. तर त्यानंतर १८ जानेवारीपासून पुन्हा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू शकतो.
हवामानातील बदलामुळे रब्बी पिकांवर परिणाम
हवामानातील बदलामुळे रब्बी पिकांवर परिणाम होत आहे. एकीकडे थंडीच्या कडाक्यानंतर पुन्हा निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, मका या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. गव्हाच्या वाढीवर परिणाम होत आहे. ज्वारी, दादरवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जर पूर्ण हंगामभर हेच वातावरण राहिले तर रब्बी हंगामाला मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे
आजपासून पुढचे पाच दिवस राहणार तापमान?
८ जानेवारी -७ अंश, कोरडे हवामान राहणार
९ जानेवारी -८ अंश, कोरडे हवामान राहणार
१० जानेवारी -८ अंश, कोरडे हवामान राहणार
११ जानेवारी -१० अंश, काही अंशी ढगाळ वातावरण, पावसाचीही शक्यता
१२ जानेवारी -११ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण, पावसाचीही शक्यता