⁠ 

पोलीस भरतीत जळगावचे नाव केले ‘रोशन’ : मात्र नियतीने केला घात

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ ।  जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूरपेठअंतर्गत आंबेडकर नगरातील रहिवासी रोशन पवार याने पोलीस भरती परीक्षेत पुण्यात जाऊन जळगावचा डंका वाजवला. मात्र नियतीने त्याचा घट केला.

अधिक माहिती अशी कि, रोशन याने पोलीस भरतीच्या तयारीसाठी मोठी मेहेनत घेतली होती. त्यानुसार त्याने पुण्याचे पोलीस भरतीचे मैदानही गाजवले. तब्बल ९० गुण पटकावले. मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण पुण्याहून घरी पोहोचत असताना त्याची प्रकृती खालावली. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांनाच त्याचा मृत्यू झाला. रोशन भैरू पवार ( वय २२ रा. पहूर ता.जामनेर) असे मयत तरुणाचे नाव असून या दुदैवी घटनेने त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

जामनेर तालुक्यातील पहूरपेठअंतर्गत आंबेडकर नगरातील रहिवासी रोशन पवार याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. पोलीस होण्याचे ध्येय उराशी बाळगून गेल्या दीड वर्षापासून रोशन याने पोलीस भरतीसाठी दिवसरात्र मेहनत घेवून तसेच धावण्यासह इतर गोष्टींची तयारी केली. त्यासाठी रोशन हा रविवारी रात्री पुण्याकडे रवाना झाला. सोमवारी मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर रोशन याला अचानक जुलाब आणि उलटीचा त्रास सुरु झाला. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तेथील स्थानिक डॉक्टरांना दाखवून उपचार केले. यात थोडीफार प्रकृती ठिक झाल्यानंतर पोलिसांनी रोशन यास पुण्यातून जळगावकडे येणाऱ्या रेल्वेत बसवून दिले.

रेल्वेत प्रवासात रोशन याने फोनवरुन मंगळवारी पहाटे पाच वाजता त्याच्या कुटुंबियांना प्रकृतीची माहिती दिली होती. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रोशन हा भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरला. याठिकाणी त्याची अजूनच प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांनी भुसावळातील रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी रोशन याचे कुटुंबिय पोहचले त्यांनी रोशनला जामनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. याचठिकाणी रोशनची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली व त्याचा दुपारी उपचार सुरु असतांना रोशन याने जगाचा निरोप घेतला.