⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जळगाव : ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी घेतले ताब्यात ; काय आहे प्रकरण?

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२३ । आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले आहे. मात्र याचदरम्यान, एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची मागणी करणार्‍या शिवसेना-उध्दव बााळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यात त्यांना भेटून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याची तयारी केली होती. या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना पत्र देऊन अधिकृत भेटीसाठी वेळ मागितला होता. तथापि, यावरून त्यांना आजपर्यंत वेळ मिळाला नव्हता. तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कालच पत्रकारांशी बोलतांना निवेदनासाठी दौरा हे योग्य ठिकाण नव्हे असे सांगितले होते.ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून नंतर मुंबई येथे निवेदन द्यावे असे त्यांनी सुचविले होते.

दरम्यान, आज ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ हे आपल्या सहकार्‍यांसह आज दुपारी भोकर येथे दाखल झाले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तर माजी नगराध्यक्ष तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांना धरणगाव पोलीस स्थानकात बोलवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.