जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२५ । जळगावसह राज्यात यंदा होळीच्या आधीपासून म्हणजे, फेब्रुवारीच्या मध्यान्हापासूनच उन्हाळ्याची सुरुवात झाली. मार्च महिना सुरू होताच तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. होळीआधीच जळगाव शहराचे तापमान चाळीशीच्या उंबरवठ्यावर पोहोचले आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने जळगावकरांना तीव्र उकाडा सहन करावा लागत आहे. बुधवारी जळगावचे कमाल तापमान ३९.४ अंश तर किमान तापमान १८.६ अंशावर पोहोचले.

होळीनंतर तापमानात वाढायला सुरवात होत असताना आताचा तापमानाचा पारा हा ४० अंशाचा घरात जाऊन पोहचला आहे. गेल्या आठवड्यात जळगावचे तापमान घसरले होते. त्यावेळी किमान तापमान १० अंशापर्यंत घसरले होते. तर कमाल तापमान देखील ३३ अंशापर्यंत पोहोचले होते. रात्रीच्या तापमानात घट झाल्याने रात्री आणि पहाटच्या वेळेला गारवा जाणवत होता. मात्र शुक्रवार ७ मार्चपासून जळगावच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना दिसून आले.
जळगावचे तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले आहे,सकाळी आठ वाजताच सुर्य नुसती आग ओकण्यास सुरवात करीत आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा चटका जाणवत आहे. यंदा सरासरीपेक्षा तापमान अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उकाडा वाढल्याने वीज आणि पाण्याचा वापर देखील वाढला आहे. तापमानाचा तडाखा वाढल्यामुळे हवमान विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असेही सांगण्यात आले आहे.