जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात मार्चअखेरीस तापमानाचा तडाखा पाहायला मिळत असून सूर्य आग ओकत आहे. काल २६ मार्च रोजी जळगावचा तापमानाचा पारा चाळीशीवर पोहोचला आहे. हे यंदाचे उच्चांकी तापमान आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता १ एप्रिलपर्यंत उष्णतेत सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

बुधवारी जळगावचे कमाल तापमान ४०. ४ अंश इतके होते तर किमान तापमान १७.८ अंश राहिले. जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील ऊन आता मार्च महिन्यातच जाणवू लागले असून उन्हामुळे अंगाची लाही लाही होत नागरिक हैराण झाले आहेत.
सकाळी 9 वाजेपासून उन्हाचे चटके बसायला लागल्याने उन्हापासून बचावापासून नागरिक दुपारी बाहेर पडणे टाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारी १२ ते ४ पर्यंत अनेक रस्त्यांवर शुकशुकाट होता. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना मळमळ व उलटीचा त्रास देखील झाला. तर दुसरीकडे उष्णतेपासून मनाला गारावा मिळण्यासाठी शीतपेयाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी पाहण्यास मिळाली.
दरम्यान, जिल्ह्यात आता १ एप्रिलपर्यंत उष्णतेत सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे. शहरात तापमान चाळिशीच्या आसपास असले तरी उष्णता जास्त जाणवेल. याकाळात कमाल तापमान ३९ ते ४२ तर किमान तापमान १९ ते २२ अंश राहण्याची शक्यता आहे. उच्च दाबाचा पट्टा, पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उष्ण व कोरडे हवामान राहून उकाड्याने नागरिक हैराण होतील.