जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । राज्यातील काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. यामुळे उष्णतेचा भडका उडाल्यामुळे जनता उकाड्यामुळे हैराण झाली आहे. काही दिवसापासून जळगावचे कमाल तापमान देखील ३५-३६ अंशावर होता. मात्र काल बुधवारी तापमानात तीन अंशांनी घट होऊन ३३ अंशावर पोहोचल्याची नोंद झाली आहे.

उत्तर-पश्चिम वाऱ्यांची बदलती दिशा व उष्ण वाऱ्यांची गती कमी झाल्याने रात्रीच्या वातावरणातील गारवा टिकून आहे. त्यामुळे बुधवारी तीन अंशांनी तापमानात घट बघायला मिळाली. बुधवारी किमान तापमान १७.२ तर कमाल तापमान ३३ अंशावर होते. त्यापूर्वी मंगळवार कमाल तापमान ३६ अंशावर होते.
दरम्यान ७ मार्चपर्यंत हीच स्थिती राहणार असल्याने किमान तापमान १४ ते १७, तर कमाल तापमान एक ते दोन अंशांनी घसरून ३४ पर्यंत खाली येईल. बुधवारी तीन अंशांनी तापमानात घट बघायला मिळाली. पण, ८ मार्चपासून तापमान ३८ अंशावर जाईल, तापमान वाढेल. १० मार्चनंतर तापमान चाळीशीपार करण्याची शक्यता आहे.