जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२५ । जळगावसह राज्यभरात आता उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. तापमान वाढल्याने दुसरीकडे राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होतोय. आगामी काळात जळगाव जिल्ह्यात उष्णतेचे लाट येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याने जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचला असून मार्च महिना शेवटच्या टप्प्यावर असतानाच उन्हाचे चटके वाढले आहेत. यामुळे जळगावकरांना कडाकाचा उन्हाळा सहन करावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी 9 वाजेपासून उन्हाचे चटके बसायला लागल्याने उन्हापासून बचावापासून नागरिक दुपारी बाहेर पडणे टाळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आगामी काही दिवसात जळगावचा पारा चाळीशीच्यावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचंही म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर उष्णतेपासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती केली जात असून उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांनी साठी सुरक्षिततेच्या उपाय योजना करण्यात आले आहेत. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष तसेच बेड ची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.