थंडी वाढली! जळगावात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद, 15 डिसेंबरपर्यंत असं राहणार तापमान?
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२४ । सध्या ‘फेंगल’ चक्रीवादळाने जळगावसह राज्यात तयार झालेले ढगाळ वातावरण निवळले असून यामुळे थंडीचा कडाका वाढू लागला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढत असून, मंगळवारी राज्यात जळगावात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे.
सोमवारी जळगावचा पारा ८.६ अंशावर गेला होता. तर, मंगळवारी त्यात अजून घट होऊन, या हंगामातील सर्वांत कमी ८ अंशाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत थंडी कमी होऊन उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र दोन दिवसांपासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. शहरात ७ डिसेंबरला किमान तापमान १४ अंशांवर तर कमाल तापमान ३१.८ अंशांवर होते. मात्र चार दिवसांतच किमान तापमान सहा अंशांनी घसरले. यामुळे जळगावकरांना हुडहुडी भरली आहे.
आगामी काही दिवस थंडीचा कडाका वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तरेकडून सक्रिय असलेल्या थंड वाऱ्यांमुळे गारठा वाढला आहे. त्यातच वातावरणदेखील कोरडे असल्याने सकाळच्या वेळेस जळगावकरांना थंडी चांगलीच झोंबतेय. सकाळच्या वेळेस धुक्याचेही प्रमाण वाढले आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे शहरात व्हायरल आजारांचे प्रमाण वाढले आहे. असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
पुढील पाच दिवस असं राहणार तापमान?
११ डिसेंबर – १० अंश
१२ डिसेंबर- ९ अंश
१३ डिसेंबर- ८ अंश
१४ डिसेंबर – १० अंश
१५ डिसेंबर – १० अंश
थंडीमुळे रब्बीची पिके तरारली
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पसरल्यामुळे रब्बीच्या हरभरा, गहू या पिकांना थंडीचा चांगलाच फायदा होत असून, शेतशिवारात रब्बीची पिके तरारली आहेत. तसेच रात्रीच्या वेळेस ओस पडत असल्याने कोरडवाहू ज्वारी, मका या पिकांना देखील फायदा होत आहे.