जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील धांडे नगर परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळ#$फास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. राजस संजय पाटील (वय २८, रा. धांडे नगर, जळगाव) असे मयत तरुणाचं नाव आहे. महिनाभरापूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता आणि काही महिन्यांत विवाह होणार होता. मात्र, त्याआधीच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राजस पाटील हा ठेकेदारी व्यवसायाशी संबंधित काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तो घराच्या वरच्या मजल्यावर गेला होता. बराच वेळ खाली न आल्याने त्याची आई त्याला बोलवण्यासाठी गेली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

राजसचा महिनाभरापूर्वीच साखरपुडा झाला होता. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात त्याचा विवाह होणार होता. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, राजसचे वडील संजय पाटील हे ज. सु. खडके विद्यालयात मुख्याध्यापक असून ३० जून रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाची तयारी घरात सुरू होती. १ जुलै रोजी सेवानिवृत्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या आनंदाच्या वातावरणावर मुलाच्या मृत्यूने दुःखाची छाया पसरली आहे.
राजस हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून त्याला एक विवाहित बहीण आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.










