पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून जळगावमधील 4000 वारकरी विशेष रेल्वेनं पंढरपूरला रवाना

जून 27, 2026 11:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी जळगाव ते पंढरपूर विशेष वारकरी रेल्वेचे आयोजन करण्यात आले असून, आज शनिवारी ४ हजारांहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेने जळगाव रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरकडे रवाना झाले. त्यामुळे वारकरी भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण असून या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

jalgaonpandharpur

यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, समतेची आणि माणुसकीची जिवंत परंपरा आहे. विठ्ठलाच्या कृपेने गेल्या पाच वर्षांपासून हजारो वारकरी बंधू-भगिनींना पंढरपूर दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे. या सेवेसाठी विठ्ठलाने मला केवळ निमित्त बनविले, हेच माझे खरे भाग्य आहे. हजारो वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची सेवा करण्याची संधी लाभणे, हेच माझ्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठे समाधान आहे,” असे भावनिक प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोप्रेमी ह.भ. प.गजानन महाराज वरसाडेकर हे होते.

जळगाव ग्रामीण व शहराने आज एका अद्वितीय आणि अविस्मरणीय भक्ती सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा मान मिळविला. आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याचा भव्य सोहळा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून उत्साहात पार पडला.

जी.एस. ग्राऊंडवर दुपारपासूनच हजारो वारकरी एकत्र जमले होते. नोंदणीकृत भाविकांना ओळखपत्रे, प्रवास पास, आवश्यक साहित्य तसेच संपूर्ण प्रवासाची माहिती देण्यात आली. त्यानंतर जी.एस. ग्राऊंडवरून नेहरू चौक मार्गे रेल्वे स्थानकापर्यंत निघालेल्या भव्य पालखी-दिंडीने संपूर्ण जळगाव शहर भक्तिमय झाले. टाळ, मृदंग, वीणा, अभंग, फुगड्या, रिंगण, हरिनामाचा अखंड गजर, भगव्या पताका, तुळशीमाळा आणि “ज्ञानोबा -.तुकोबा… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…” माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी… या जयघोषात हजारो वारकरी एकाच लयीत विठ्ठलनामात तल्लीन झाले होते. जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक हा संपूर्ण मार्ग जणू पंढरीच्या वारीचेच रूप धारण करून बसला होता.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः दिंडीत सहभागी होत टाळ वाजवत वारकऱ्यांसोबत अभंगांचा गजर केला. त्यानंतर रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्यात जाऊन त्यांनी वारकऱ्यांची विचारपूस केली. ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, दिव्यांग भाविक तसेच इतर वारकऱ्यांच्या सुविधा तपासून प्रत्येकाशी संवाद साधला. रेल्वे सुटेपर्यंत ते स्थानकावर उपस्थित राहून सर्व व्यवस्था स्वतः पाहत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि GPS मित्रपरिवार यांनी केले. नोंदणी, ओळखपत्रे, रेल्वेतील आसनव्यवस्था, डॉक्टरांचे पथक, प्रथमोपचार पेट्या, पिण्याचे पाणी, नाश्ता, भोजन, स्वयंसेवक, पंढरपूरमधील निवास, महाप्रसाद, दर्शन व्यवस्था आणि परतीच्या प्रवासाचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने करण्यात आले.

विशेष रेल्वेतील प्रत्येक डब्यात दोन स्वयंसेवक, वैद्यकीय मदत, औषधे, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी निवास, चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

गौप्रेमी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, समाधान महाराज भोजेकर, ज्ञानेश्वर महाराज व परमेश्वर महाराज पाळधीकर, पांडुरंग महाराज, अनिल महाराज, मयूर महाराज, गजानन महाराज.धरणगावकर, मंगलसिंग महाराज, लाला महाराज, विठोबा महाराज, कृष्णा महाराज या सर्वांनी पालखीची धुरा सांभाळली.

यांची होती विशेष उपस्थिती
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे माजी महापौर ललित कोल्हे उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह नगरसेवक टाळकरी माळकरी वारकरी यांच्यासह महिलांची विलक्षण अशी उपस्थिती होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now