जळगाव लाईव्ह न्यूज । काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला आता दमदार पावसाची प्रतीक्षा लागली असून अशातच शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पावसाच्या दीर्घ ओढीमुळे जिल्ह्यातील पावसाची तूट तब्बल २० टक्क्यांवर पोहोचली असली, तरी आगामी काही दिवसांत पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, १३ सप्टेंबरपासून जळगाव जिल्ह्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून, १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान काही भागांत दमदार पाऊस होऊ शकतो.

बंगालच्या उपसागरात सध्या बाष्पयुक्त ढगांची निर्मिती होत असून ते मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या दिशेने सरकत आहेत. हवेची दिशा अनुकूल राहिल्यास हे ढग जळगाव जिल्ह्याकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, १७ सप्टेंबरनंतर बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्राकार हवेचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या त्याची दिशा उत्तर प्रदेशाकडे असल्याचे दिसत असले, तरी त्यात बदल झाल्यास महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता वाढू शकते. त्यामुळे या प्रणालीची दिशा जिल्ह्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
परतीच्या पावसाकडेही लक्ष
चक्रीवादळाची दिशा बदलली नाही, तर २० सप्टेंबरनंतर परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा परतीचा पाऊस फारसा दमदार राहणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान अपेक्षित असलेल्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







