Jalgaon Politics : जळगाव शिवसेनेच्या महापौरांनी घेतली एकनाथराव खडसेंची भेट, राजकीय चर्चेला उधाण
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी आज आमदार एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे. एकीकडे शिवसेना सरकार कोसळणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे जळगावात सेना आणि राष्ट्रवादीचा एकोपा वाढत असल्याचे पाहून मनपा वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
जळगावच्या महापौर जयश्री महाजन आणि विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. खडसे यांच्यासोबत सलोख्याचे संबंध आहेत. महापौर झाल्यापासून जयश्री महाजन व त्यांचे पती विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी अनेकवेळा एकनाथराव खडसेंच्या भेटी घेतल्या आहेत. महाजन दाम्पत्य कायमच खडसेंच्या संपर्कात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महापौर व त्यांचे पती सुनील महाजन यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर जयश्री महाजन या महापौर झाल्या होत्या. मी कट्टर शिवसैनिकच आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा आम्ही देखील भाग आहोत. महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा नुकतेच विधान परिषद निवडणुकीत विजय झाला असल्याने आज त्यांची भेट घेत अभिनंदन केले. अशी प्रतिक्रिया महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली आहे.
एकीकडे राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेतल्याने जळगाव जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुंबई आणि ठाण्यातील नगरसेवकांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांना समर्थन देत असताना जळगावात आज घेण्यात आलेली ही भेट चक्क विरोधी म्हटली जात आहे.