जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२४ । जळगावकरांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जळगाव विमानतळावरुन २७ ऑक्टोबरपासून दररोज गोवा-जळगाव-हैदराबाद ही विमानसेवा सुरू होणार
खरंतर उडान ५.० योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून फ्लाय ९१ विमान कंपनीने गोवा-जळगाव-हैदराबाद आणि गोवा-जळगाव-पुणे अशी विमान सेवा सुरू केली आहे. गोवा-जळगाव-हैदराबाद ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस तर गोवा-जळगाव-पुणे ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे.
फ्लाय ९१ कंपनीने आता हिवाळी वेळापत्रक तयार केले असून यात गोवा-जळगाव-हैदराबाद ही विमानसेवा २७ ऑक्टोबर ते २९ मार्च २०२५ दरम्यान दररोज सुरू असणार आहे. त्यामुळे हिवाळ्यात गोवा येथे पर्यटनाला जाणाऱ्यांना आता दररोज विमानसेवा उपलब्ध होणार आहे.
तर पुणे-मुंबई सेवा नियमित कधी सुरू होणार याची देखील नागरिकांना आता प्रतीक्षा आहे. जळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता जळगावकरांचा प्रवास सुखद होणार आहे.