छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेल्या मंदिराच्या रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी

जळगाव लाईव्ह न्यूज | ३० डिसेंबर २०२२ | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘नियोजन’मधून धरणागाव शहरातील सांडेश्वर मंदिर रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे. हा विषय केवळ एक मंदिर व मंदिरापर्यंत जाणार्‍या रस्त्याचा नसून याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. कारण धरणगाव शहरातील श्री सांडेश्वर महादेव मंदिराला मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिरात एक दिवस मुक्काम केल्याची नोंद आहे. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या पावनस्पर्शामुळे हे मंदिर केवळ धरणगाव शहरातील नागरिकांचेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचे श्रध्दास्थान आहे.

धरणगाव पालिका हद्दीत १६३० मध्ये महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेले प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी अनेक वर्षांपासून धरणी नाल्याला लागून वहीवाट वजा रस्ता होता. श्रावण मासात मंदिरात येणार्‍या हजारो शिवभक्तांना ये-जा करताना अक्षरशः चिखल, गारा तुडवत व काटेरी झुडपे पार करीत वाट काढावी लागत होती. या रस्त्यासाठी शिवभक्तांतर्फे आग्रही मागणी लावून धरण्यात आली होती. अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या विषयात लक्ष घालून सांडेश्वर मंदिर रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि धरणगावचा संबंध
छत्रपती शिवाजी महाराजांचा खान्देशशी प्रथम संबंध आला तो आग्रा भेटीला जाताना महाराज ५ मार्च १६६६ रोजी राजगडावरून संभाजीराजेंना बरोबर घेऊन निवडक चार-पाचशे सैनिकांसह औरंगाबादमार्गे खान्देशातून बर्‍हाणपूरला पोहोचले. जळगाव जिल्ह्याला महाराजांचा पावनस्पर्श झाल्याची मोठी नोंद म्हणजे, महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर (जळगाव जिल्हा) मधील नोंदींनुसार, छत्रपती शिवाजी महाराज स्वत: ऑक्टोबर १६७४ मध्ये मोठ्या मोहिमेवर निघाले होते. या मोहिमेदरम्यान राजे धरणगाव येथे येवून गेले. सुरत फॅक्टरीच्या दुसर्‍या पत्रावरुन स्पष्ट होते की, मराठा सेनेने १ जानेवारी १६७५ रोजी धनसंपन्न धरणगाव व येथील इंग्रजांच्या वखारी लुटून खूप संपत्ती स्वराज्यासाठी हस्तगत केली. या पहिल्या छाप्यानंतर सुमारे चार वर्षांनी म्हणजे १६७९ मध्ये महाराजांच्या सैन्याने पुन्हा धरणगाव व चोपड्यावर हल्ला करुन मुघल सैन्यांला सळो की पळो करुन सोडले, अशीही शासन दप्तरी नोंद आहे.