१ लाखाची लाच घेताना जळगावचा पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात ; पोलीस दलात खळबळ

एप्रिल 14, 2026 11:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२६ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार कमी न होता उलट ते वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत जळगावमधील शनीपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. विनोद पितांबर अहिरे (वय ४०) असं लाचखोर पोलिसाचे नाव असून या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार हे जळगावचे रहिवासी असून त्यांच्या मुलाविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज निकाली काढण्यासाठी आणि त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आरोपी विनोद अहिरे यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली होती. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.

आज, १३ एप्रिल रोजी एसीबीने शनीपेठ परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून तडजोडअंती १ लाख रुपये स्वीकारताना विनोद अहिरे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत कलम ७ नुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

यांनी केली कारवाई

ही धडक कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, संगिता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे आणि अमोल सुर्यवंशी यांचा समावेश होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now