जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२६ । जळगाव जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलिसांनी तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून याच मोहिमेचा एक भाग म्हणून, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत जप्त करण्यात आलेला तब्बल १३६२ किलो सुका गांजा आज (दि. ११ मे) संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या गांजाची किंमत २ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाचे फौजदारी अपील क्रमांक ६५२/२०१२ मधील निर्देश, तसेच केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (ANTF, मुंबई) यांच्या सूचनेनुसार जप्त केलेल्या अंमली पदार्थांची तात्काळ विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले होते.

या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करत जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी हा अवाढव्य मुद्देमाल नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी जळगाव येथील अंमली पदार्थ केंद्रीय मुद्देमाल कक्षात जमा असलेल्या साठ्याचा सविस्तर आढावा घेतला.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती’च्या देखरेखीखाली झाली. यावेळी समितीचे सदस्य अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदिप ठाकूर, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे, तसेच वजन व मापे विभागाचे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय दोरकर, पोलीस हवालदार संदीप पाटील, जयंत चौधरी, अजय पाटील आणि रवींद्र चौधरी यांनी ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली







