⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

भर बाजारात रिक्षात उतरला विद्युत प्रवाह, पोलीस ठरला देवदूत!

जळगाव लाईव्ह न्यूज | चेतन वाणी | ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय सोमवारी सायंकाळी जळगावकरांना आला. भर बाजारात महात्मा फुले मार्केटसमोर एक रिक्षाच्या पाईपमध्ये विद्युत तार अडकली आणि रिक्षात विद्युत प्रवाह उतरला. नेमके त्याच वेळी तेथून जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने ही बाब हेरली आणि देवदूत बनून मदतीला धावून गेला. पोलिसाच्या सतर्कतेने गर्दीत अनेकांचे प्राण वाचले आहेत.

सध्या उन्हाचा कडाका वाढला असल्याने बाजारात सायंकाळच्या सुमारास गर्दी होत आहे. त्यातच रमजान ईद व अक्षय तृतीया असल्याने गर्दी अधिक आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास टॉवर चौकाकडून घाणेकर चौकाकडे रिक्षा क्रमांक एमएच.१९.सीडब्ल्यू.४५९० जात होती. महात्मा फुले मार्केटच्या समोर विद्युत डीपी जवळून रिक्षा घेऊन जात असताना बाहेर आलेली विद्युत तार रीक्षाच्या वरील पाईपमध्ये अडकली.

चालक दीपक बन्सीलाल देवराज रा.मोहन नगर यांच्या प्रकार लक्षात येताच ते बाहेर पडले पण तोवर रिक्षात विद्युत प्रवाह संचारल्याने दीपक देवराज यांना देखील झटका बसला. शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप नन्नवरे हे प्रतिबंधात्मक कारवाईतील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा येथे हजर करून पुन्हा पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांना तो प्रकार दिसला. दुचाकीवरून उतरून त्यांनी लागलीच सर्व नागरिकांना बाजूला केले.

चालक दीपक देवराज यांना विद्युत झटका बसला असल्याने प्रदीप नन्नवरे यांनी त्यांना मीठ मिश्रीत पाणी पाजले. पोलीस कर्मचारी प्रदीप नंन्नवरे यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने आज भर गर्दीत मोठा अनर्थ टळला आहे. अपघातामुळे मोठी गर्दी जमली होती मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी धाव घेत विद्युत प्रवाह खंडित करून तार बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.