रिल्स बनवा अन् बक्षीस मिळवा…! मतदान जागृतीसाठी जळगाव महापालिकेची रिल्स स्पर्धा

डिसेंबर 26, 2025 10:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीसाठी मतदारांत जनजागृती व तरुणाईचा सहभाग वाढवण्यासाठी जळगाव महापालिकेका प्रशासन व स्वीप अभियानाच्या संयुक्त विद्यमाने रिल्स मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष उत्कृष्ट रिल्स बनवणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.

manapa 2

सोशल मीडियासारख्या प्रभावी आणि वेगवान माध्यमाचा उपयोग करून मतदारांपर्यंत थेट पोहोचणे, हा स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. सध्याच्या काळात सोशल मीडिया हे जनसंपर्काचे प्रभावी साधन ठरत असून, विशेषतः तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या माध्यमाशी जोडली गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन मतदानाचे महत्त्व, प्रत्येक मताचे मूल्य, लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी तसेच मतदान हा आपला हक्क व कर्तव्य आहे, हा संदेश रील्सच्या माध्यमातून पोहोचविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी तयार केलेल्या रील्समध्ये मतदान जनजागृतीचा सकारात्मक व प्रेरणादायी संदेश असणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार, उमेदवारांचे समर्थन अथवा विरोध तसेच आचारसंहितेला बाधा पोहोचेल, असा मजकूर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ३ हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक २ हजार रुपये रोख तर तृतीय १ हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. प्रशासनाने स्पर्धेसाठी काही नियमावली जाहीर केली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास स्पर्धक बाद ठरेल. या स्पर्धेत स्पर्धकाचे वय १८ वर्षे पूर्ण असावे आणि तो जळगाव शहराचा नागरिक असावा लागणार आहे. रील पोस्ट केल्यावर मनपाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट @jcmc.digital ला टॅग करणे अनिवार्य असणार आहे.

१४ जानेवारीपर्यंत स्पर्धेचा कालावधी
ही स्पर्धा २४ डिसेंबर २०२५ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत चालणार आहे. स्पर्धकाने तयार केलेल्या व्हिडिओमधून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now