जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२६ । महापालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे स्थायी समिती सभापतीपद अखेर निश्चित झाले आहे. जळगाव शहर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या हाती येणार आहे. आज गुरुवारी स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपकडून डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी सिंधुताई कोल्हे यांनी अर्ज दाखल केला आहे.

महापालिकेत महापौरपदानंतर सर्वात महत्त्वाचे स्थायी समितीचे सभापती पद असते. या पदावर कोण विराजमान होणार याकडे लक्ष लागून होते. दरम्यान आज गुरुवारी जळगाव महापालिकेच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे दोन्ही इच्छुकांनी अधिकृत अर्ज सादर केले. डॉ. पाटील यांनी स्थायी समितीसाठी तीन अर्ज दाखल करून आपली दावेदारी भक्कम केली, तर सिंधू कोल्हे यांनी महिला व बालकल्याण समितीसाठी दोन अर्ज सादर केले.

यावेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिंदे सेनेचे गटनेते विष्णू भंगाळे, नितीन बरडे, नितीन लढ्ढा, दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, डॉ.अमृता सोनवणे, प्रतिभा देशमुख, गायत्री राणे, सुरेखा तायडे आदी उपस्थित होते.
स्थायी समिती ही महानगरपालिकेतील सर्वात महत्त्वाची आणि आर्थिकदृष्ट्या प्रभावी समिती मानली जाते. त्यामुळे या समितीच्या सभापतीपदासाठी होणारी निवड ही राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरते. दुसरीकडे महिला व बालकल्याण समिती ही महिला सक्षमीकरण आणि बालकल्याणाशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
दोन्ही सभापती निवडीसाठी २७ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल पिठासीन अधिकारी असतील. या सभेत दोन्ही नवनियुक्त सभापतींच्या नावांची औपचारिक घोषणा केली जाईल.











