डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यासाठी जळगाव सज्ज

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२३ । भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती जळगाव शहरात अत्यंत उत्साहात व शिस्तबद्धपणे साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील जयंती उत्सव समितीसह स्थानिक पदाधिकार्‍यांनी नियोजन केले आहे.

शुक्रवार, 14 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार असल्याची माहिती आहे. शहरातील प्रत्येक चौकात महामानवा अभिवादन करणारे बॅनरही झळकले आहेत. तर निळ्या ध्वजाला देखील नागरीकांकडून मागणी असल्याने दोन दिवसांपासून शहरातील विविध भागात विक्रेते दाखल झाले आहेत.

शहरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त राखण्याचे नियोजन केले असून सोशल मिडीयावरही पोलिसांची करडी नजर आहे.

शहरात सर्वत्र बॅनर्स, निळे झेंडे व निळ्या रंगात रोशनाई करण्यात आल्याने संपूर्ण शहर निळेमय झाले आहे. रात्री दुभाजकातील पोलवर लावण्यात आलेली निळ्या रंगाची रोशनाई आकर्षण ठरत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.