जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२६ । सोने आणि चांदी खरेदी प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. सुवर्णनगरी जळगावात आज सकाळी बाजार उघडताच मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी दरवाढ पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात प्रति तोळा (१० ग्रॅम) तब्बल २ हजार रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात प्रति किलो ३ हजार रुपयांची मोठी उसळी नोंदवण्यात आली आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहक आणि व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारात सोन्या-चांदीचे दर सातत्याने घसरत होते. त्यामुळे ‘दर आणखी कमी होतील’ या आशेने अनेक ग्राहक वाट पाहत होते, तर काही जण खरेदीसाठी बाजारात गर्दी करत होते. मात्र, अवघ्या दोन दिवसांत बाजारपेठेने अचानक घेतलेल्या यू-टर्नमुळे ग्राहकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. लग्नसराई आणि आगामी सणासुदीच्या काळात झालेली ही दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे.

आज सकाळी सराफ बाजार उघडताच झालेल्या दरवाढीनंतर जळगावात २२ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे ₹१,३१,१७०, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,४३,२०० इतका झाला आहे. याशिवाय चांदीचा दर प्रति किलो ₹२,२७,००० इतका नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, लग्नसराई आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या वाढलेल्या किमतींचा थेट परिणाम ग्राहकांच्या बजेटवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याला वाढलेली मागणी यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये पुन्हा तेजी दिसून येत आहे. आगामी काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होणार की पुन्हा घसरण होणार, याकडे ग्राहकांसह सराफा बाजाराचेही लक्ष लागले आहे.









