⁠ 

Jalgaon Famous Food : जळगावात आलेल्या पाहुण्यांनी चाखायलाच हवा असा अस्सल खान्देशी बेत!

जळगाव लाईव्ह न्यूज । रजत भोळे (Jalgaon Famous Food) जळगाव शहर सोन्याच्या शुद्धतेसाठी तर जिल्हा कापूस, केळीच्या भांडारसाठी प्रसिद्ध आहे. खान्देशचा भाग असलेल्या जळगावकरांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या काही पदार्थांची चव लय भारी असते. जळगावकरांकडे पाहुणे आल्यास त्यांचा पाहुणचार करताना आपल्या घरातल्या मेनू कार्डमध्ये या काही निवडक पदार्थांचा समावेश केल्यास पाहुणे मंडळी आयुष्यभर ती चव जिभेवर रेंगाळत ठेवतील. खान्देशी कुटुंबात बहुतांशवेळी केल्या जाणाऱ्या या पदार्थांची सर बाहेर जिल्ह्यातील नागरिकांना येणार नाही.

भरीत व कळण्याची भाकरी (Jalgaon Famous Bharit-Bhakari)

जळगावातील अस्सल मेनूची सुरुवात होते ती भरताच्या वांग्यापासून. यावल तालुक्यातील बामणोद गावातील भरीताची वांगी प्रसिद्ध असून भरताच्या वांग्यांना जीआय मानांकन देखील मिळाले आहे. वांग्याचे भरीत ही मेजवानी जळगावात आल्यावर नक्की खायलाच पाहिजे अशी आहे. मऊ, लुसलुशीत, आणि झणझणीत भरीताला लोकांची पसंती असते. जळगावात काही हॉटेल्स तर केवळ भरीत विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. खान्देशात भरीतसोबत पारंपरिक खाद्य म्हणजे कळण्याची भाकरी खाल्ली जाते. बऱ्याच वेळा हिवाळ्यात भरीत पार्ट्या रंगतात तेव्हा कळण्याची भाकर आणि कोशिंबीर असा बेत असतो. विशेषतः पाहुणे मंडळी आल्यावर त्यांना भरीतचा आस्वाद आवर्जून देतात.

डाळ गंडोरी (Dal Gandori)

खान्देशातील प्रसिद्ध खाद्य मेजवानीत डाळ गंडोरीचा देखील समावेश होतो. डाळ गंडोरीची भाजी तूर डाळपासून तयार केली जात असली तरी त्यात रंगत आणणारे घटक वेगळेच असतात. तूर डाळसोबतच त्यात आंबट चुका, अदरक, लसूण, गरम मसाला, हिंग, खोबरे आणि यासह स्थानिक मसाले वापरून डाळ गंडोरी बनवली जाते. खास करून लेवा समाजमध्ये डाळ गंडोरीचा बेत आवर्जून असतो. डाळ गंडोरीसोबत बाजरीच्या भाकरीला जास्त पसंती असते. छान भाकरीचा काला कुस्करून त्यात डाळ गंडोरीची भाजी टाकून मस्त बेत मारता येतो.

वरण बट्टी – घोटलेल्या वांग्याची भाजी (Varan Batti)

वरण बट्टी त्यावर तुपाची धार आणि घोटलेल्या वांग्याच्या भाजीवर लिंबाचा रस असं जेवणाचं ताट समोर ठेवलं तर कोणीही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. जळगावात वरण बट्टीला विशेष खाद्याचा दर्जा मिळाला असून घरी काही कार्यक्रम, लग्न सोहळा किंवा उपवास सोडताना पाहिलं प्राधान्य वरण बट्टी, घोटलेली वांग्याची भाजी आणि शिरा या जेवणाला दिले जाते. जळगावात आल्यावर वरण बट्टीचे जेवण आवडीने केले जाते. वरण बट्टीच्या जेवणाचा मेनू पाहुणचारात आवर्जून केला जातो. बाहेरगावची बरीच मंडळी तर घरी आल्यावर खास वरण बट्टी तयार करण्याचा आग्रह करतात. पाहुणे आल्यावर हॉटेलातून पार्सल घेऊन जात नागरिक पाहुणचार करतात.

पातोड्याची मसालेदार भाजी (Patodi Bhaji)

खान्देशात मसाले भाज्यांना देखील तितकीच पसंती असते. जळगावातील काळा मसाला काही खास असतो. जळगावच्या शेव भाजीसोबत प्रसिद्ध असलेली एक भाजी म्हणजे पातोड्याची भाजी. मसाले भाजीचा रस्सा आणि त्यात बेसन पिठापासून बनवलेली काजुकतलीच्या आकारासारखे पातोडी ही मेजवानी देखील अतिशय लोकप्रिय आहे. पातोडीची भाजी, पोळी, भात, लिंबू, लोणचं, उडीद पापड असा बेत पाहुणचारासाठी बऱ्याचदा वापरला जातो.

वरण पोळी व गंगाफळाची भाजी (Varan Poli)

महाराष्ट्र व विशेषता जळगाव जिल्ह्यात वरण, पोळी, भात, गंगाफळच्या भाजीला पारंपारिक जेवण समजलं जाते. तूर डाळचे वरण व गंगाफळाची पिवळ्या रंगाची भाजी असा मेनू बऱ्याचदा उपवास सोडण्यासाठी बनवला जातो. गावाकडील लग्नाच्या किंवा भंडार्‍याच्या पंगतीत देखील वरण, पोळी, भात व गंगाफळाच्या भाजीला महत्त्व दिले जाते. गंगाफळची भाजी घोटून देखील तयार केली जाते. लाल मिरची आणि हिरवी मिरची घालून दोन्ही प्रकारे गंगाफळची भाजी तयार करतात. दोघांची चव वेगळी असल्याने पाहुणे मंडळीला देखील ते आवडते.