⁠ 
सोमवार, मे 6, 2024

जळगावात वाढला धुळीचा त्रास, डोळ्यांच्या सुरक्षेसाठी करा हे उपाय 

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । जेव्हा धूळ आपल्या डोळ्यांवर उडते तेव्हा त्या धुळीतील काही कण आणि जिवाणू आपल्या डोळ्यात जातात त्यामुळे संसर्ग निर्माण होतो. आपल्या डोळ्यांना खाज येणे, डोळ्यांमध्ये लाली येणे, डोळ्यातून पाणी गळणे असे त्रास होतात. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल घालणे आणि बाहेरून आल्यावर स्वच्छ पाण्याने डोळे धुणे आवश्यक असल्याचा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.चेतन पाटील यांनी दिला आहे.

जळगावात धुळीचे प्रमाण सर्वाधिक असून त्यामुळे डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे. जळगावकर नागरिकांनी डोळ्यांची कशाप्रकारे काळजी घ्यावी यासाठी नेत्ररोग तज्ज्ञ चेतन पाटील यांच्याशी जळगाव लाईव्ह न्यूजने खास संवाद साधला.

डॉ.चेतन पाटील म्हणाले कि, धुळीमुळे आपल्या डोळ्यांना संसर्गाचा त्रास होतो. बाहेर पडताना पूर्ण चेहरा झाकून डोळ्यावर गॉगल वापरावा. धुळीमुळे सर्दी झाल्यास त्याचा डोळ्यांना त्रास होतो. बाहेरून आल्यानंतर चेहरा आणि डोळे स्वच्छ धुवून घ्यावे, असे ते म्हणाले.

सध्या हवामान बदलत असून पावसाळा डोळ्यांचा संसर्ग होण्यासाठी पूरक काळ असतो. एकाला डोळ्यांचा संसर्ग झाल्यास त्याचा हात इतरत्र लागल्यास त्यांना देखील संसर्ग होतो. अरेनो व्हायरस हा गंभीर असून आपण वेळीच लक्ष न दिल्यास त्याचे दुष्परिमाण अधिक आहेत. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी असला तरी कोरोनाची सुरुवात अगोदर डोळ्यात होते हे नागरिकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. डोळ्यांना लाली येणे, डोळे जळजळ करणे असा त्रास होत असल्यास तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे नेत्ररोग तज्ज्ञ चेतन पाटील यांनी सांगितले.

आपल्याकडे नागरिकांना सवय असते डोळ्यांचा एखादा त्रास झाल्यास ते जवळच्या मेडिकलवर जाऊन एखादा ड्रॉप घेतात. नागरिकांनी स्टिरॉइड असलेल्या ड्रॉपचा उपयोग टाळावा. मेडिकल चालकांनी देखील नागरिकांना तसे ड्रॉप देणे टाळावे, असे आवाहन देखील डॉ.पाटील यांनी केले आहे.

धूळ आणि संसर्गजन्य आजार डोळ्यांसाठी खूप घटक आहेत. डोळ्यांच्या बुबुळाला संसर्ग झाल्यास पुढे त्यावर उपचार घेणे फार त्रासदायक असते. बाहेर निघतांना शक्यतो चेहऱ्यावर मास्क आणि रुमाल बांधवा. डोळ्यांवर गॉगल किंवा चष्मा वापरावा आणि कोणताही त्रास झाल्यास नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन डॉ.चेतन पाटील यांनी जळगावकर नागरिकांना केले आहे.