जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२६ । जुलैच्या सुरुवातीला राज्यभर धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याने अनेक भागांत उकाड्याचा त्रास वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत. पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढली होती. मात्र, आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून भारतीय हवामान विभागाने (IMD) जळगावसह राज्यातील विविध भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील ठाणे व रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर आणि पुणे घाटमाथा, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा घाटमाथा, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यातही काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याचे संकेत
जळगाव जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची प्रक्रिया सुरू असून तो हळूहळू प्रभावी होत आहे. त्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह वाढत असून १५ आणि १६ जुलैदरम्यान जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील काही भागांत दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, या काळात पावसाचे वितरण सर्वत्र समान राहणार नाही. काही ठिकाणी चांगला पाऊस होईल, तर काही भागांत केवळ ढगाळ वातावरण आणि जोरदार वाऱ्यांचा अनुभव येऊ शकतो. पुढील दोन दिवसांत ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ३४ ते ४० किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचू शकतो, असेही त्यांनी सांगितले.







